राठोडांना धक्का! ; 16 ब्राह्मण संघटनांचा जगतापांना पाठिंबा
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहर मतदारसंघात दोन्ही भैयांमध्ये सरळ लढत होत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. तसेच समर्थक फोडाफोडीला वेग आला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांना मोठा धक्का दिला आहे. संग्राम जगताप यांनी ब्राह्मण समाजासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून सोळा संघटनांनी एकत्र येत आमदार जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे अनिल राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
शनिवारी (दि.१२) सायंकाळी गुलमोहर रोडवरील हॉटेल सायंतारा येथे पार पडलेल्या बैठकीत ब्राह्मण महासंघाच्या 16 संघटनांनी संग्राम जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सनातन धर्म सभा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, अखिल भारतीय बहुभाषिय ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ, परशुराम प्रतिष्ठान, ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण सभा भिंगार, ब्राह्मण सभा केडगाव, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क, ब्राह्मण सभा एमआयडीसी, समर्थ परिवार, अहमदनगर जिल्हा पुरोहित संघ, ब्राह्मण सभा आगरकर मळा आदी संघटनांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले. अहमदनगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी सचिव मंदार मुळे उपाध्यक्ष ऋषिकेश कुलकर्णी आदींच्या पाठींब्याच्या पत्रावर सह्या आहेत. हा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला नसून वैयक्तिक संग्राम जगताप यांना असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला मानणारे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित असल्याचे समोर आले आहे.
Post a Comment