नगर-पारनेर दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी आता माझा लढा



निलेश लंके; पाणी फाऊंडेशनच्या जलमित्रांचा सारोळा कासार येथे सत्कार

माय नगर वेब टीम

अहमदनगर- दुष्काळमुक्तीसाठी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत अनेक गावांनी मोठे काम उभे केले आहे. परंतु, दुर्दैवाने पाऊस झालेला नाही. पावसाचा लहरीपणा दिवसेंदिवस वाढत असल्याने कायम दुष्काळी असलेल्या नगर-पारनेर तालुक्याला शाश्वत पाणी मिळाल्याशिवाय येथील शेती व्यवसाय चालणार नाही. त्यामुळे या दुष्काळी भागाला शाश्वत पाणी मिळण्यासाठीच यापुढील काळात आपण लढा देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके यांनी केले.

पाणी फाऊंडेशनच्या 'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन जलसंधारणाचे मोठे काम करणाऱ्या नगर तालुक्यातील जलमित्रांचा लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने सारोळा कासार (ता. नगर) येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनेवाडीचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेव पाटील दळवी होते. या कार्यक्रमास शिक्षकनेते संजय धामणे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, माजी सरपंच भानुदास धामणे, सोसायटीचे चेअरमन दादाभाऊ पाटील, अरुण कडूस, राजाराम धामणे, गोरख काळे, बाजार समितीचे निरीक्षक संजय काळे, बापूराव धामणे, दत्तात्रय कडूस, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस जयसिंग कडूस, बाबुर्डीचे उपसरपंच अण्णा चोभे, सोनेवाडीचे उपसरपंच नितीन दळवी यांच्यासह सोनेवाडी, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद येथील जलमित्र व नागरिक उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, कमी लोकसंख्येच्या गावात पथदर्शी काम करणे सोपे असते परंतु मोठ्या गावात अनेक अडचणी येतात. चांगल्या कामालाही विरोध होतो. तरीही सारोळा कासारसह अन्य गावातील जलमित्रांनी रणरणत्या उन्हात गावासाठी कष्ट घेतले. या जलमित्रांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. या भावनेतूनच हा गौरव सोहळा आयोजित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सामाजिक चळवळीत काम करत आहोत. नगर-पारनेर मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वाढती बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य सुविधा याशिवाय शेतीला शाश्वत पाणी यावरच आपण लक्ष केंद्रीत केले असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्ञानदेव दळवी यांनी दुष्काळी भागाला शाश्वत पाणी मिळण्यासाठी साकळाई योजनेसह पिंपळगाव जोगा धरणाच्या पाण्यासाठीही आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात उपसरपंच जयप्रकाश पाटील यांनी स्पर्धेच्या ५० दिवसाच्या कालावधीत केलेल्या कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक झरेकर व बाळासाहेब धामणे यांनी केले तर संजय काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post