विषयपत्रिकेवरील विषय सुरू होण्याआधीच सभा तहकूब; नगरसेवक निलंबित



माय नगर वेब टीम

श्रीरामपूर - आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेली पालिकेची सर्वसाधारण सभा काल चार महिन्यांनंतर आयोजित करण्यात आली. मात्र विषयपत्रिकेवरील विषयांचा ‘श्रीगणेशा’ होण्याआधीच शहरातील अचानकनगर व नेहरुनगर येथील महिलांनी आपल्या समस्यांची कैफियत मांडण्यासाठी भर सभेत प्रवेश केला. या महिलांना सभेत बोलावण्याचा विरोधकांचा पूर्वनियोजित कट होता असा आरोप नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी करत नगरसेवक मुख्तार शहा यांना आपण निलंबीत करत असून त्यांनी सभा सोडून जावे असा आदेश सोडला. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच जुंपली.अखेर विषयपत्रिकेवरील कोणत्याही विषयावर चर्चा न होताच सभा तहकूब करण्यात आली. अशा प्रकारची सभा तहकूब होण्याची पालिकेच्या सभेतील ही पहिलीच घटना आहे.

काल पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक अंजुम शेख, श्रानिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, रवि पाटील, संजय फंड, प्रमोद लबडे, अ‍ॅड. संतोष कांबळे, सुभाष गांगड, शामलिंग शिंदे, राजेंद्र पवार, मुख्तार शहा यांच्यासह नगरसेविका भारती कांबळे, स्नेहल खोरे, तरन्नूम जहागिरदार उपस्थित होते.

प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे गृहराज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी यावेळी प्रवरा नदीपात्रात बसविण्यात येत असलेल्या प्रोफॉईल वॉलला विरोध करून त्याबाबत ठराव करण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी नव्याने पालिकेत आलेल्या विभाग प्रमुखांची ओळख करून देण्याची मागणी केली. त्यानुसार अधिकार्‍यांनी ओळख परेड सुरू झाली. याच दरम्यान, अनुकंपा तत्वावर पालिकेत नव्याने भरण्यात आलेल्या पदांमध्ये पाथर्डीसह इतर ठिकाणचे कर्मचारी असल्याचे समोर आले.
दरम्यान, सत्ताधारी व विरोधकांचे प्रश्‍न सुरू असतानाच अचानक काही महिलांनी आपल्या समस्यांचे निवेदन घेऊन सभेत प्रवेश केला सभेत गोंधळास प्रारंभ झाला. शिपाई त्यांना बाहेर काढत असताना नगरसेवक मुख्तार शहा प्रवेशद्वारात गेले. त्यानंतर नगरसेवक मुख्तार शहा यांनी या महिलांना सभेत बोलाविल्याचे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगत माझ्या अधिकारात मी मुख्तार शहा यांना निलंबीत करत असून त्यांनी सभेतून निघून जावे, असा आदेश केला. मात्र मुख्तार शहा यांनी संबंधित महिलांना मी बोलावले नसल्याचे सांगितले, असाच गोंधळ सुरू असताना नगराध्यक्षा आदिक यांनी सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post