गडकरी यांच्या विजयाला उच्च न्यायालयात आव्हान




माय नगर वेब टीम

नागपूर - केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नितीन गडकरी यांच्या निवडणुकीतील विजयाला प्रतिस्पर्धी उमेदवार नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारा आव्हान दिले आहे. गडकरी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली व अवैध पद्धतीने निवडून आल्याचा दावा पटोले यांनी केला असून गडकरी यांची निवडणूक रद्द ठरवून आपल्याला विजयी करण्याची मागणीही पटोले यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाने ११ मार्च २०१९ ला लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात नागपुरात निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीसाठी गडकरी यांनी २५ मार्चला उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत जोडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात गडकरींनी चुकीची माहिती सादर केली. त्यांनी आपल्या उत्पन्नाचा स्रोत शेती दाखवला आहे. पण, त्यांच्या नावावर एकही शेतजमीन नाही. दुसरीकडे प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या वडिलांचे नाव चुकीचे लिहिले आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपले उत्पन्न जाणीवपूर्वक कमी दाखवले आहे. त्यांनी चुकीची माहिती दर्शवून मतदारांमध्ये गैरसमज निर्माण केला व निवडणूक जिंकली. त्यानुसार वैध मतांचा विचार केल्यास आपणच निवडणूक जिंकलो असून गडकरींची निवड रद्द ठरवण्यात यावी आणि आपल्याला विजयी घोषित करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका नाना पटोले व सुरेश हेडाऊ यांनी दाखल केली. या याचिकेवर लवकरच उच्च न्यायालयात सुनावणी होईल. नाना पटोले यांच्यावतीने अ‍ॅड. वैभव जगताप हे काम पाहात आहेत

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post