
माय नगर वेब टीम
अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेने शहरातील मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नेमलेल्या युनिव्हर्सल अॅनिमल वेलफेअर सोसायटीने त्यांचे देयक न मिळाल्यामुळे गुरुवारपासून काम थांबविले आहे. दोन दिवसांपूर्वी कुत्र्यांनी बालकांवर केलेल्या हल्ल्यानंतर लगेच संस्थेने काम थांबविल्याने महापालिकेची धावपळ उडाली आहे.
या संस्थेचे गेल्या वर्षभरापासूनचे बिल थकविले असल्याचे म्हटले आहे. काम थांबविल्याने महापालिका प्रशासन चांगलेच कोंडीत सापडले आहे. यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या उपद्रव वाढण्याची शक्यता आहे. संस्थेने महापालिका आयुक्तांना गुरुवारी पत्र देऊन काम थांबविण्यात आल्याचे कळविले आहे. त्यात म्हटले आहे, की संस्थेमार्फत महापालिका हद्दीतील मोकाट कुत्रे पकडणे, श्वान निर्बीजीकरण केंद्र पिंपळगाव माळवी येथे नेऊन निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून औषधे उपचार, खान पान, अँटी रेबीज लसीकरण करून श्वान पुन्हा मूळ जागी सोडण्याचे काम केले जाते.
यासाठी स्वतःचे वाहन, कर्मचारी, डॉक्टर व इतर साहित्यासह 16 जून 2018 पासून खर्च करण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत कुत्र्यांवर करण्यात आलेल्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियांचे देयक अदा करण्यात आलेले नाहीत. ही अत्यावश्यक सेवा असून नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वाची असल्यामुळे व संस्था स्वयंसेवी असून देयकाभावी निधीची कमतरता आहे. देयके द्यावेत, यासाठी 28 मे 2019 व त्या नंतर 6 जून 2019 रोजी पत्र दिले होते. आज तब्बल दीड महिना होऊनही अद्यापही संस्थेस प्रलंबित देयक न मिळाल्यामुळे संस्था या पुढे काम पूर्ण देयक मिळेपर्यंत बंद ठेवणार आहे. मागील एक वर्षापासून अविरतपणे केलेल्या कामाचे पूर्ण देयक अदा केलेले नसल्याने व मागील दीड महिन्यापासून लेखी अर्ज निवेदन देऊन देयक अदा करण्यास टाळाटाळ केल्याचे जाणवत आहे. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे हे जाणीवपूर्वक देयकाची फाईल पुढे पाठवत नाहीत. तसेच ठेक्याची एक वर्षाची मुद्दत संपली असून मुद्दतवाढीचा प्रस्तावही सादर केलेला नाही.
Post a Comment