थोरातांनी घेतली गांधी व पवारांची भेट ; दिला ' हा ' महत्त्वाचा सल्ला
माय नगर वेब टीम
अहमदनगर – काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच दिल्ली दौर्यात आ.बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी औपचारिक चर्चा झाली. मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसची वाटचाल, आगामी विधानसभा निवडणूक याबाबत नेत्यांनी त्यांच्याकडे काही अपेक्षा व्यक्त केल्याचे समजते.
काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख असलेल्या आ.थोरातांकडे आता राज्यातील काँग्रेसचे संपूर्ण सुकाणू आले आहेत. काही दिवसांपूर्वीच पक्षाने त्यांना विधिमंडळ गटनेतेपद बहाल केले होते. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवून पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. निवड झाल्यानंतर सोमवारी आ.थोरात दिल्लीला पोहचले होते.
या दौर्यात त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गांधींनी त्यांच्याकडून पक्ष संघटना अधिक मजबूत करून राज्यात सकारात्मक यशाची अपेक्षा व्यक्त केली. पक्षसंघटनेतील बळकटीसाठी कठोर निर्णय घेण्यासाही डगमगू नका, असा सल्ला आ.थोरातांना दिल्याचे समजते. या भेटीतील अधिक तपशिल समजू शकला नाही.
सायंकाळी आ.थोरात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीला गेले. यावेळी खा.सुप्रिया सुळे आणि खा.सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने निर्णयांबाबत चर्चा केली. रणनिती आखणीसाठी कमी वेळ असल्याचा विषय यावेळी निघाला. त्यामुळे वेगाने निर्णय घ्यावे लागतील, असे पवारांनी सुचविल्याचे समजते.
आघाडीची घडी बसविताना पवारांनी ताकद द्यावी. दोन्ही पक्ष जिंकण्यासाठी एकमेकांना पुरक भुमिका घेतील. त्यासाठी निर्णय प्रक्रीयेत वेग राखला जाईल, अशा मुद्यांवर उभयतात चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, आ.थोरातांच्या भेटीनंतर पवारांनी ट्विट करून आगामी विधानसभेबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली.



Post a Comment