वादाच्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेची सर्वसाधारण सभा
माय नगर वेेेब टीम
अहमदनगर – महापौर बाबासाहेब वाकळे आणि शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यातील वादानंतर काही दिवस जात नाहीत, तोच आता उपमहापौर मालन ढोणे यांनी शिवसेनेचे उपनेते आणि शिवसेनेवर कठोर टीका केल्यामुळे शिवसेना भाजपमधील दरी रूंदावत चालली असून, त्याचे परिणाम आज मंगळवारी होणार्या सर्वसाधारण सभेत दिसण्याची शक्यता आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज मंगळवारी होत आहे. प्रभाग समित्यांची पुनर्रचनेसह इतर विषय सभेसमोर आहेत. घाईघाईत कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय पुरवणी विषयपत्रिका काढून घेतलेला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती खालावत असतानाच आता कर्मचार्यांना सातवा वेतन लागू केल्यानंतर येणारा आर्थिक ताण कसा सहन करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. त्यासाठी उत्पन्न वाढीचे विविध पर्याय या सभेत सुचविण्यात येण्याची शक्यता आहे. महापालिकेने चित्रपटगृह व विविध करमणूक करणार्या संस्थांकडून अद्याप करमणूक कर घेतलेला नाही. ही बाब आता समोर आल्याने त्यावर प्रशासन विचार करत असल्याचे समजते.
प्रभाग पुनर्रचनेमुळे अनेक भागातील प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. झेंडीगेट प्रभाग समिती पूर्णतः संपुष्टात येणार असल्याने त्या भागातील नगरसेवकांची याबाबत काय भूमिका राहील, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. पूर्वीच्या रचनेनुसार प्रभागातील काही भाग एका समिती कार्यालयच्या कक्षेत तर काही भाग दुसर्या समिती कार्यालयाच्या कक्षेत येत होता. नवीन पुनर्रचनेचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, त्यास या सभेत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेत नवीन सत्ताधारी आल्यानंतर प्रथमच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सभा होत आहे. यापूर्वी विविध निवडी आणि अर्थसंकल्प याच सभा झाल्या. अर्थसंकल्पीय सभेत पाणीप्रश्नासह इतर प्रश्नांवर नगरसेवकांनी चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी पाणीप्रश्नासाठी स्वतंत्र सभा घेण्याचे आश्वासन महापौर वाकळे यांनी दिले होते. ती सभा झालीच नसल्याने नगरसेवकांची काय भूमिका असेल, ते पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
Post a Comment