जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार, सभापतींनी दिले चौकशीचे आदेश
माय नगर वेब टीम
मुंबई - राज्याचा दुष्काळ समूळ नष्ट करण्यासाठी युती सरकारकडून जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराची कबुली खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी लाचलुचपत खात्याला या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत पुन्हा उपस्थीत कऱण्यात आला. गेल्या आठवड्यात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता. आज याबाबत प्रश्न उपस्थित होताच जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा तिच उत्तरे द्यायला सुरुवात केली. तेव्हा विरोधकांनी यावर आक्षेप घेताच सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्वत: यामध्ये हस्तक्षेप करत लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान राज्यभरातील सुमारे १३०० जलयुक्त शिवारची कामे आहेत जिथे गैरव्यवहार झाला आहे. अशा ठिकाणी जिल्ह्या बाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करुन विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. याबाबत तांत्रिक अहवाल आल्यावरच या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही हा निर्णय घेऊ असे जलंसधारण मंत्र्यांनी स्पष्ट केले होते.
Post a Comment