
माय नगर वेब टीम
मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरु होत्या. प्रदेशाध्यक्षपदासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील व अहमदनगर जिल्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या अडीच महिन्यांवर आल्या असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील हे स्पष्ट झाले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळामध्येच चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दानवे यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वितीय केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदावर वर्णी लागली. दानवे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदासाठी विनोद तावडे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांच्याकडे राज्यमंत्रिपदाचा भार आहे. ते ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनाच पसंती होती. अखेर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुका या पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. तर राज्याच्या कॅबिनेटपदी वर्णी लागल्यानंतर आशिष शेलार यांच्याकडील मुंबई भाजप अध्यभक्षपद काढून घेत त्या पदावर मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Post a Comment