‘इंडियन ऑईल’कडून शेतकर्‍यांची फसवणूक ; जमिनींचे कवडीमोल दाम - फळबागांवर बुलडोझर, विरोध करणार्‍यांना गुन्ह्याची भीती


माय नगर वेब टीम

अहमदनगर- गुजरात (कोपली) ते सोलापूर या पाईपलाईन प्रकल्पाचे काम करताना इंडियन ऑईल कंपनीने नगर तालुक्यातील शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक चालविली आहे. पाईपलाईनसाठी जमिनींच्या वापरापोटी तसेच फळबागांच्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना कवडीमोल दाम देण्यात येत असून कंपनीची नुकसानभरपाई अमान्य करणार्‍या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची भीती अधिकारी घालत आहेत. या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांच्या जमिनी, फळबागा आणि इतर पिकांचे नुकसान होत असून जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालून शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.

इंडियन ऑईल कंपनीची सदरची पाईपलाईन ही नगर तालुक्यातील निंबळक, निमगाव, सोनेवाडी, अकोळनेर, खंडाळा, बाबुर्डी घुमट, वाळकी या गावांच्या शिवारातून जाते. सध्या या पाईपलाईनचे काम वेगाने सुरु आहे. पाईपलाईनसाठी शेतकर्‍यांच्या जमिनीच्या वापरापोटी नुकसानभरपाई देताना कंपनीच्या अधिकार्‍यांनी मोठा भेदभाव करत शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे.

सर्वच जमिनीसाठी एकच दर
पाईपलाईनसाठी जमिनीचा वापर करताना कंपनीने रेडीरेकनरच्या दरानुसार नुकसान भरपाई दिल्याचे सांगण्यात येते. तथापि सर्वच प्रकारच्या जमिनींसाठी एकच दर निश्‍चित करुन कंपनीने मनमानी पद्धतीने कामकाज चालविल्याचे स्पष्ट होत आहे. जिरायती, बागायती आणि महामार्गालगतच्या जमिनीचे दर वेगवेगळे निघत असताना कंपनीने सर्व प्रकारच्या जमिनींसाठी एकच दर आणि तोही अत्यंत कमी निश्‍चित केला आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

फळबागांवर कंपनीचा बुलडोझर
तालुक्यातील शेतकरी अजूनही भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. भयावह दुष्काळात पाण्यावर लाखो रुपयांचा खर्च करुन बाबुर्डी घुमट, वाळकी येथील शेतकर्‍यांनी आपल्या फळबागा जगविल्या आहेत.
मात्र शेतकर्‍यांनी जीवापाड जपलेल्या या फळबागांची किंमतही कंपनीने कवडीमोल ठरवली आहे. जी बाग जगविण्यासाठी शेतकर्‍याने 8 ते 10 लाखाचे पाणी घातले आणि जी फळबाग वार्षिक 5 ते 7 लाखाचे उत्पन्न देते त्या फळबागेची किंमत ठरविताना कंपनीने अन्यायकारक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे बाधित शेतकर्‍यांना कंपनीचे अधिकारी कोणतीच माहिती देत नाहीत. शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता कंपनीचे अधिकारी मनमानी करत असून हमखास उत्पन्न देणार्‍या फळबागा कंपनीकडून उद्ध्वस्त केल्या जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अधिकार्‍यांचे संवेदनाशुन्य वर्तन
कंपनीकउून होत असलेल्या फसवणुकीला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात अशी धमकीवजा भीती कंपनीचे अधिकारी घालत आहेत. कंपनीकडून पाईपलाईनसाठी 60 फुट रुंद व 7 फुट खोल खोल अशी खोदाई केली जात असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खालचा मुरुम, दगड वर येत असल्याने सदरची जमिन पुढील अनेक वर्षे नापिक होणार आहे. त्याचबरोबर जेमतेम पावसावर पेरणी केलेल्या खरीप पिकांचेही कंपनीकडून नुकसान केले जात आहे. पाईपचा अडथळा असल्याने अनेक शेतकर्‍यांना पेरणीही करता आली नाही. शेतकर्‍यांचा विरोध असतानाही कंपनीचे अधिकारी कोणालाही जूमानत नाहीत. अधिकारी संवेदनशुन्य पद्धतीने वर्तन करत असल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. कंपनीने बाबुर्डी घुमट, वाळकी येथील फळबागा तसेच खरीपाच्या पिकांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी अन्यथा फसवणुकी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post