छावण्यांसाठी रास्तारोको ; संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, रामदास भोर यांच्यासह 50 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात




माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील चार चारा छावण्यांवर ढिसाळ व्यवस्थापनाचा ठपका ठेवत प्रशासनाने त्या छावण्यांची मान्यता रद्द केली. त्यामुळे जनावरांनावर उपासारीची वेळ आली. प्रशासनाने कारवाई केलेल्या छावण्या पुन्हा सुरु करण्यात याव्यात या मागणीसाठी शेतकर्‍यांसह शिवसेनेच्यावतीने जनावरांसह नगर-पुणे बायपास चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.



 आंदोलनादरम्यान कारवाई केलेल्या छावण्या सुरु करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी एकच गोंधळ उडाला. शेतकर्‍यांनी जनावरे पोलिस गाडीत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, नगर तालुका पंचायत समिती सभापती रादास भोर यांच्यासह सुमारे 50 जणांना ताब्यात घेतले आहे.




शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे बायपास चौकात रास्तारोको आंदोलन केले. आंदोलन सकाळी दहा वाजता सुरु केले ते साडेअकरा पर्यंत चालले. यावेळी मोठ्या प्रमाणात दुतर्फ़ा रांगा लागल्या होत्या.
नगर तालुक्यातील चार चारा छावण्यांवर ढिसाळ व्यवस्थापनाचा ठपका ठेवून प्रशासनाने त्यांचे मान्यता रद्द केली आहे. याबाबत शेरे बुकात कारवाईची कसलीही नोंद नाही. छावणीचालकांना कारवाईची कोणतीही कल्पना दिली गेली नाही. प्रशासनाकडून छावण्यांवर एकतर्फी कारवाई करण्यात आली. चालकांना आपली बाजु मांडण्याची संधी न देता प्रशासनाकडून छावण्या बंद करण्याची कारवाई केली. छावण्या बंद झाल्याने जनावरांची उपासमार होत आहे. त्यामुळे या छावण्या तत्काळ सुरू कराव्यात अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
 विसापुर तलावात पाणी नसल्याने घोसपुरी पाणी योजना बंद पडली आहे. पाऊस नसल्याने टँकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे येत आहेत. पाणीटंचाई अन् चारा टंचाईने शेतकरी बेजार झाला असताना प्रशासनाकडून कोणतेही कारण न देता छावण्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप कार्ले यांनी केला.
छावण्यांची मान्यता रद्द केलेल्या गावांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. कारवाई केलेल्या छावण्यांधील जनावरे दुसर्‍या गावच्या छावणीत न्या असा सल्ला प्रशासन शेतकर्‍यांना देत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासन छावण्यांवर एकतर्फी कारवाई करत आहे. त्यामुळे कारवाई केलेल्या छावण्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. आंदोलनात सुमारे 500 शेतकरी जनावरांसह सहभागी झाले होते.


गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण
शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही- संदेश कार्ले
प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे चार चारा छावण्यांतील जनावरांवर उपासारीची वेळ आली आहे. त्या छावण्या पुन्हा सुरु करण्यात याव्यात यासाठी सनदशीर मार्गाने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. परंतु, पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु, तालुक्यातील शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे. छावण्या सुरु होईपर्यत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post