माय नगर वेब टीम
अहमदनगर -
नगर तालुक्यातील चार चारा छावण्यावर बेशिस्तीचा कारभार व ढिसाळ व्यवस्थापनाचा ठपका ठेवून प्रशासनाने कारवाई केली. याबाबत शेरे बुकात कारवाईची कसलीही नोंद नाही. छावणीचालकांना कारवाईची कोणतीही कल्पना दिली गेली नाही. प्रशासनाकडून छावण्यांवर एकतर्फी कारवाई करण्यात आली. चालकांना आपली बाजु मांडण्याची संधी न देता प्रशासनाकडून छावण्या बंद करण्याची कारवाई केली. छावण्या बंद झाल्याने जनावरांची उपासमार होत आहे. त्यामुळे या छावण्या तत्काळ सुरू कराव्यात अशी मागणी जि.प. सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांनी केली. याबाबत शिवसेनेच्या वतीने उद्या दि. २़९ रोजी नगर - पुणे बायपास रोडवर जनावरांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या विविध पथकाने तपासणी करून जनावरांच्या संख्येत तफावत, अनियमितता, आणि ढिसाळ व्यवस्थापनाचे कारण देत तालुक्यातील सारोळा कासार, अकोळनेर, नारायण डोहो, घोसपुरी या चार छावण्यावर कारवाई करण्यात येऊन त्यांची मान्यता रद्द करण्यात आली. तपासणी करताना छावण्यांत कोणत्या त्रुटी आढळून आल्या याची नोंद शेरे बुकात करणे आवश्यक असताना अधिकाऱ्यांकडून तशी कोणतीही नोंद केली नाही. छावण्यांवर कारवाई केल्याची माहिती चालकांना दिली गेली नाही. प्रशासनाने या छावण्यांवर एकतर्फी कारवाई केली कशी ? छावण्यावर कारवाई करताना चालकांना आपली बाजु मांडण्याची संधी प्रशासनाने का दिली नाही. असा प्रश्न संदेश कार्ले यांनी उपस्थित केला आहे. विसापुर तलावात पाणी नसल्याने घोसपुरी पाणी योजना बंद पडली आहे. पाऊस नसल्याने टॅंकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे येत आहेत. पाणीटंचाई अन् चारा टंचाईने शेतकरी बेजार झाला असताना प्रशासनाकडून कोणतेही कारण न देता छावण्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप कार्ले यांनी केला.
छावण्यांची मान्यता रद्द केलेल्या गावांमध्ये पावसाचे आगमन झाले नाही. जनावरांचा होत असलेला पोटमारा छावण्यांमुळे थांबला आहे. दुष्काळी परिस्थिती असताना प्रशासन एकतर्फी कारवाई करत आहे. प्रशासनाच्या कारवाईला शिवसेनेचा प्रखर विरोध असून, छावण्या पुन्हा सुरू करण्यात आली असून, उद्या दि .२९ रोजी नगर - पुणे बायपास रोडवर जनावरांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जि.प. सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, अशोक झरेकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
अनुदानाअभावी चालकांवर कर्जाचा डोंगर : संदेश कार्ले .
छावणीचालकांना अनुदानाची रक्कम अजुनही मिळाली नाही. जिल्हाधिकारी बीले पाठवा असे सांगतात. मात्र छावण्यांची बीले चालकांनी तहसील कार्यालयाकडे महिनाभरापुर्वीच पाठविली आहेत. बीले पुढे पाठविण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याचे छावणीचालक सांगत आहेत. छावणीचालक उसवारी करून छावणी चालवत आहेत. काहींनी व्याजाने पैसे घेतले. अनुदान मिळत नसल्याने व्याजाची रक्कम वाढत चालली आहे. त्यात अधिकारी बीले मंजुरीसाठी पैशाची मागणी करत आहेत. अनुदान मिळत नसल्याने चालकांवर कर्जाचा भार वाढत चालला आहे. चालकांना तत्काळ अनुदान दयावे अशी मागणी संदेश कार्ले यांनी केली आहे.
Post a Comment