माय नगर वेब टीम
अहमदनगर -
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेने नगरच्या राजकारणात भयाण शांतता आहे. असे असतानाच त्यांनी आज रात्री माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी धाव घेत भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे नगर शहराचे राजकारण वेगळे वळण घेऊ पाहत असल्याचे बोलले जात आहे. माजी खासदार गांधी- आमदार जगताप यांच्या एकत्रित चर्चेच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून पक्षातील कार्यक्रमांपासून अलिप्त आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकांनाही जात नाहीत. दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे वजनदार मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाल्याने स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईला धाव घेत मंत्री शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जगताप मंत्री शिंदे यांना भेटलेच नाहीत असे सांगितले आहे. तसेच आमदार जगताप यांनीही शिवसेनेत जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
जगताप शिवसेनेत जाणार! ही चर्चा शांत होत नाही तोच
आज नगर मुक्कामी असलेल्या राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्षा व भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या भेटीसाठी आ. संग्राम जगताप हे माजी खासदार यांच्या निवासस्थानी आज रात्री दहा वाजता दाखल झाले. त्यांनी महिला आघाडीच्या अध्यक्षांचा यथोचित सत्कारही केला. यावेळी माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी, उपमहापौर मालनताई ढोणे उपस्थित होत्या. अध्यक्षा रहाटकर, माजी खासदार गांधी, आ. जगताप यांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही.
गांधी-जगताप मैत्री सर्वश्रुत
नगर शहराच्या राजकारणात माजी खासदार दिलीप गांधी व आमदार संग्राम जगताप यांनी मैत्री सर्वश्रुत आहे. प्रत्येक निवडणुकीत हे एकमेकांशी पूरक भूमिका घेतात असे बोलले जाते. महापालिकेत सर्वाधिक 24 नगरसेवक असतांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मनपात भाजपाचा महापौर, उपमहापौर आहे. आगामी विधानसभेत उपनेते अनिल राठोड यांना रोखण्यासाठी गांधी-जगताप यांनी व्ह्यूव रचना तर नसेल ना असा प्रश्न नगरकर उपस्थित करत आहेत.
Post a Comment