माय नगर वेब टीम
अहमदनगर - शरण मार्केट मधील गाळ्यांवर बुलडोझर चालवून प्रशासनाने येथील व्यावसायिकांना रात्रीतून रस्त्यावर आणले आहे. आता महापालिकेनेच गाळेधारकांचे तातडीने कायमस्वरूपी पुनर्वसन करून गाळेधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
महापालिकेने केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे. सन २००० मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांनीच शहरातील हातावर पोट भरणाऱ्या टपरीधारक, हातगाडी चालकांना ही जागा उपलब्ध करून दिली होती. याचा प्रशासनाला सोयीस्कर रित्या विसर पडलेला दिसतो.
तत्कालीन जिल्हाधिकारी विमलेंद्र शरण यांच्या आदेशा वरुन नगरपालिकेनेच हे गाळे बांधले होते. मग नगरपालिकेने बांधलेले गाळे बेकायदेशीर अथवा अतिक्रमित कसे होऊ शकतात, असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या या कारवाई मुळे गरीब व्यावसायिकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. त्यांच्याकडे उपजीविका चालविण्याचा कोणताही पर्याय राहिलेला नाही. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांची कुटुंबे चालतात, मुले शिक्षण घेतात. त्यामुळे ही कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने गाळेधारकांच्या पुनर्वसनाचे आधी नियोजन करून मग कारवाई करायला पाहिजे होती.
सन २००० मध्ये प्रशासनाने तात्पुरते पुनर्वसन केले होते. आता महापालिकेने गाळेधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले पाहिजे. त्यासाठी महापालिकेने योग्य जागा उपलब्ध करून द्यावी आणि गाळेधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी किरण काळे यांनी केली आहे.
सत्ताधारी आणि प्रशासनाने पाडापाडी करण्या आधी उभारणीचे नियोजन करावे
महापालिका पाडापाडी करण्यामध्ये कायम अग्रेसर असते. नेहरू मार्केट पाडण्याची तत्परता दाखविणाऱ्या महापालिकेला अजूनही त्याठिकाणी नियोजित उभारणीचे काम करणे जमलेले नाही. आकाशवाणी केंद्रा मागील खुले सांस्कृतिक भवन देखील मनपाने मोडीत काढले. प्रोफेसर कॉलनी चौकातील गाळे देखील एखाद्या दिवशी अचानकपणे रात्रीतून बुलडोझर लावून उद्वस्त केले जाऊ शकतात.
तेव्हा गोरगरिबांचे संसार देशोधडीला लावण्या आधी आणि शहरातील गरीब व्यावसायिकांना बेरोजगार करण्या आधी महापालिकेने त्यांच्या उभारणीचे काम करावे. नुसती पाडापाडी करू नये, असे आवाहन महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला किरण काळे यांनी केले आहे.
Post a Comment