17 गावांची योजना सुरळीत करा अन राहुरीतील त्या गावांचे कनेक्शन कट करा - लाभधारक गावांची मागणी /
माय नगर वेब टीम
अहमदनगर - वारंवार या ना त्या कारणाने बंद पडणारी सोनई-करजगावसह 17 गावांची पाणी योजना पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर सोनईकरांनी आज शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सदर गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे संबधीत गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले असल्याचे टीका करत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अधिका-यांना धारेवर धरले. योजना अपुर्ण असतांना बिले दिल्यामुळे गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला. सदर रक्कम अधिकारी व ठेकेदाराकडून वसुल करून तात्काळ योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करा. राहुरी तालुक्यातील त्या गावातील अनाधिकृत कनेक्शन बंद करण्याची मागणी माजी आमदार गडाख यांनी केली. यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी तहसिलदार रूपेश खुराणा, महाराष्ट्र जिवण प्राधिकरण कार्यकारी अभियंता बी.एस. अहिरे, उप अभियंता नाडगौडा, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश सोनवणे, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अंनत परदेशी यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गडाख, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडित, रामनाथ बडे, पानेगावचे सरपंच संजय जंगले, शरद आरगडे, कडुबाळ कर्डिले यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जावळे, नेवासा पोलीस ठाण्याचे पीआय ढेरे, सोनईचे एपीआय जनार्धन सोनवने, शिंगणापूरचे एपीआय राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली 60 पोलीस अधिकाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त होता. शनिवार असल्याने शनिभक्तांच्या वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन तास रास्ता रोको सुरू होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी सोनई, शिंगणापूर व नेवासा पोलिसांनी परिश्रम घेतले.
Post a Comment