माय नगर वेब टीम
अहमदनगर- आ. शिवाजीराव कर्डिले यांचे पुतणे आणि नगर बाजार समितीचे संचालक संदीप कर्डिले यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ व्यापारी, शेतकरी, हमाल, मापाडी आणि कर्मचारी एकवटले आहेत. कर्डिले यांचा राजीनामा मंजूर करू नये. या मागणी उद्या शनिवारी (दि.18) मार्केट बंदची हाक व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान या बंदमुळे बाजार समितीचे राजकारण चांगलेच तापले आहे.
बाजार समितीच्या भाजी बाजारातील व्यापारी, हमाल, मापाडी आणि कर्मचार्यांची शुक्रवारी (दि.17) बैठक झाली. या बैठकीत संदीप कर्डिले यांच्या राजीनाम्या संदर्भात चर्चा होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीच्या स्विकृत संचालकपदी संदीप कर्डिले यांची नियुक्ती झाल्यानंतर कामकाजात मोठी सुसूत्रता आली आहे.
व्यापारी, शेतकरी कर्मचार्यांना बरोबर घेऊन कर्डिले यांनी समितीचा कारभार चांगल्या पद्धतीने चालविला आहे. परंतु संचालक मंडळातील काहींना हा चांगला कारभार देखवत नसल्याने त्यात हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढले होते. अशा कारभाराला कंटाळूनच कर्डिले यांनी राजीनामा दिला आहे. परंतु त्यांचा राजीनामा मंजूर करू नये. समितीला त्यांची गरज असून त्यांच्या समर्थनार्थ शनिवारी (दि.18) भाजी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.
कर्डिलेंच्या राजीनाम्याची कारणे माहित नाहीत - सभापती शिंदे
संदीप कर्डिले यांच्या संचालक पदाच्या राजीनाम्याबाबत बोलताना सभापती विलास शिंदे यांनी काहीही माहिती नाही असे उत्तर दिले. त्यांनी कोणत्या कारणाने राजीनामा दिला हे सांगता येणार नाही. परंतु ते राजीनामा देणार असे बोलले होते. त्यावेळी त्यांना असे करू नका असे सांगितले होते. असे स्पष्ट करतानाच या विषयावर आ. शिवाजीराव कर्डिले यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही असे सभापती शिंदे यांनी स्पष्ट केले.
सभापतींचे कामकाजात लक्ष नाही : संदीप कर्डिले
नगर बाजार समिती सध्या आर्थिक अडचणीत आहे. कर्मचार्यांचे पगार थकीत आहेत. काही ठेकेदारांची बीले अनेक महिन्यांपासून थकली आहेत. असे असताना सभापती विलास शिंदे समितीच्या कामकाजात लक्ष देत नाहीत. त्यांचा मनमानी कारभार चालू असून समितीच्या कामकाजासाठी ते वेळ देत नाहीत. बाजार समितीची प्रगतशील वाटचाल पुर्वपदावर येण्यासाठी कामकाजात पुर्ण वेळ देणे गरजेचे आहे. या सर्व कारभाराची व्यवस्थित घडी बसविण्यासाठी नियोजनाची गरज आहे. परंतु त्याकडे सभापतींचे लक्ष नाही. त्यामुळेच आपण संचालकपदाचा राजीनामा सभापती आणि सचिवांकडे दिला आहे. असे स्पष्ट करत या संदर्भात आ. कर्डिले यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु आज किंवा उद्या त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे संदीप कर्डिले यांनी सांगितले.

Post a Comment