माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - तालुक्यातील खारेकर्जुने आणि परिसरात आठ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी (16 नोव्हेंबर) रात्री वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात एक बिबट्या अडकला असल्याचा दावा वनविभागाने केला. पण वनविभाग खोटे बोलत असल्याची शंका गावकर्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी खारेकर्जुने येथे एक बिबट्या विहिरीत पडलेला आढळून आल्याने गोंधळ अधिक वाढला. दरम्यान, विहिरीत पडलेल्या बिबट्याला नेण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन आले असता गावातील महिलांनी त्यांना मज्जाव केला. एक तर बिबट्याला ठार मारा, अन्यथा आम्ही फाशी घेऊ, अशी आक्रमक भूमिका घेत विरोध केला.
12 नोव्हेंबर रोजी खारेकर्जुने येथे पाच वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिचा जीव घेतला. निंबळक येथे आठ वर्षाच्या मुलाला जखमी केले. प्राण्यावरही हल्ले झाले आहेत. आठ दिवसांपासून परिसरात भितीचे वातावरण आहे. बिबट्याला ठार मारण्यासाठी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे खारेकर्जुने परिसरातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्याकडून जारी करण्यात आले. दरम्यान, रविवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात एक बिबट्या अडकला. सोमवारी सकाळी त्याला वनविभागाचे पथक घेऊन गेले. याबाबत ग्रामस्थांना कोणतीच कल्पना न दिल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत वनविभागाच्या कर्मचार्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. वनविभाग बिबट्या पकडल्याचा बनाव करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आणि गावात एकत्र येऊन आंदोलन केले.
त्यातच सोमवारी (17 नोव्हेंबर) दुपारी खातगाव रस्त्यावरील पानसंबळ वस्तीवर एका विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. बिबट्या विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांना कळताच त्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. तसेच बिबट्याला विहिरीतून पकडण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे पथक दाखल झाले. पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी पिंजराही आणला. पण महिला आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, या बिबट्याला ठार मारा, अन्यथा आम्ही फाशी घेतो अशी भूमिका घेतली. बिबट्याने खारेकर्जुने येथील मुलीला ठार मारले आहे.
निंबळकमध्ये मुलावर हल्ला केला. पाळीव प्राण्यांवर हल्ले केले. त्यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. विहिरीत पडलेला बिबट्या नरभक्षक आहे. त्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढू नका, ठार मारा अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेशही दिले असल्यामुळे बिबट्याला विहिरीतून बाहेर काढू नका, बिबट्याला ठार मारा अशी मागणी लावून धरली. सायंकाळी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
ग्रामस्थ आक्रमक
गेल्या आठ दिवसांपासून खारेकर्जुने परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. सहा वर्षीय चिमुरडीचा जीव घेतला तर निंबळकमध्ये मुलावर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. दरम्यान, बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाने गावात पिंजरे लावले आहेत. या पिंजर्यात रात्री बिबट्या अडकला. वनविभागाने ग्रामस्थांना विचारत न घेता आणि कोणतीही कल्पना न देता सोमवारी सकाळी पकडलेला बिबट्या घेऊन गेला. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. वनविभागाने बिबट्या धरलाच नाही, तर ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पकडलेला बिबट्या वनविभागाने ग्रामस्थांना दाखवला नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमावस्थेत आहेत. बिबट्याबाबत यापुढील काळात अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी वनविभाग आणि जिल्हाधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले.




Post a Comment