“अकोलेच्या समशेरपुर गटातून मीच योग्य उमेदवार” — गणेश चिंधू खोकले
माय नगर वेब टीम
अकोले : समशेरपुर गटाची आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते गणेश चिंधू खोकले यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी झाल्याने प्रत्येक गटातून योग्य उमेदवार निवडून येणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खोकले यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की, “समशेरपुर गटात असा उमेदवार आवश्यक आहे, जो कार्यकर्त्यांना व जनतेला आपलासा वाटेल. पदनिष्ठ, स्थानिकांशी नाळ जपणारा, शेतकऱ्यांच्या व युवकांच्या समस्या जाणणारा उमेदवारच जनतेचा विश्वास संपादन करू शकतो.”
या गटातील सुमारे ६० टक्के मतदार हे ४० वर्षांखालील युवक-युवती आहेत. त्यामुळे युवा विचारधारेचा उमेदवार या गटासाठी योग्य ठरेल, असेही खोकले यांनी म्हटले आहे.
समशेरपुर गट ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे. आदिवासी समाजाचे दैवत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे जन्मगाव या गटात आहे. तसेच विश्रामगड (पट्टाकिल्ला), टाहाकारी येथील अंबाबाई मंदिर, बिताका किल्ला, केळेश्वर तीर्थक्षेत्र, समशेरपुर जोशीवाडा यांसारख्या स्थळांमुळे या भागाचे वैशिष्ट्य अधोरेखित होते.
खोकले पुढे म्हणाले, “मी उच्चशिक्षित युवक असून, समाजाशी जवळीक साधणारा कार्यकर्ता आहे. काम करताना समाजातील विविध स्तरांतील समस्या जवळून पाहिल्या आणि जाणून घेतल्या.
गणेश खोकले हे आदिवासी संघर्ष समिती आणि रायझिंग ट्रायबल फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून गोरगरीब, आदिवासी घटकांसाठी कार्यरत आहेत. त्यांनी वृक्षलागवड, शैक्षणिक उपक्रम, घरकुल योजना, मुलांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन, आरोग्य जनजागृती अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजात कार्य केले आहे.
“समाजातील ज्येष्ठ, तरुण आणि मित्रपरिवार यांच्या आग्रहास्तव मी समशेरपुर गटातून उमेदवारी करण्यास इच्छुक आहे. विकासाची विचारधारा पुढे नेण्यासाठी माझ्या उमेदवारीस योग्य पाठबळ मिळेल, असा मला विश्वास आहे,” असेही गणेश खोकले यांनी सांगितले.
Post a Comment