संकटात जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहिले लोकनेते नीलेश लंके
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे शेवगाव, पाथर्डी, कर्जत-जामखेड तसेच नगर तालुक्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या ओसंडून वाहू लागल्याने अनेक शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले. शेतातील उभ्या पिकांचे नुकसान, घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे झालेले आर्थिक व मानसिक हाल, तसेच जनावरांचे मृत्यू या सर्व घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या कठीण प्रसंगी लोकनेते खासदार नीलेश लंके यांनी जनतेच्या सोबत राहून संवेदनशीलता आणि जबाबदारीचा आदर्श नमुना ठेवला आहे. गेल्या २० दिवसांपासून त्यांनी जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्त भागांचा दौरा करत थेट जनतेच्या व्यथा, अडचणी आणि गरजा जाणून घेतल्या.
४ ऑक्टोबर रोजी खासदार लंके यांनी देवटाकळी, ढोरसडे-अंत्रे, शेरतकळी तसेच कर्जत-जामखेड परिसरातील पूरग्रस्त गावांना भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष पिकांचे, घरांचे आणि जनावरांचे नुकसान तपासून पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून पंचनामे व मदतकार्य तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
सरकारी मदत पोहोचण्याआधीच खासदार लंके यांनी स्वतःच्या पुढाकाराने १००० हून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट व भांडी संच वाटप केले. आजच्या भेटीदरम्यानही त्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन नागरिकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम वस्त्यांतील नागरिक भारावून गेले.
अनेक नागरिकांनी भावनिक शब्दांत व्यक्त केल्या. “आजवर आमच्या गावात कोणताही खासदार आलेला नाही… पण निलेशदादा आले!”
या वेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, “पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाची मदत पोहोचवण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योग्य भरपाई मिळेपर्यंत मी थांबणार नाही.”
या मदतकार्यादरम्यान शिवशंकर राजळे, हरीश भर्डे, शिरीष काले, बंडू रासने, बाळासाहेब काले, मौली निमसे, संपत मागर, भाऊराव मलवडे, शिवाजी खराडे, योगीराज गाडे, सचिन गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार लंके यांनी दाखवलेली उपस्थिती, संवेदनशीलता आणि कृतीशीलता यामुळे पूरग्रस्त भागात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. जनतेत असा विश्वास दृढ झाला आहे की — “संकटात निलेशदादा आमच्या पाठीशी आहेत.”
Post a Comment