सावधान! अनधिकृत फटाका गोडाऊनमुळे नागरिकांचा जीव धोक्यात? गोडाऊन धारकांकडून नियम ढाब्यावर, प्रशासनाची भूमिका गुलदस्त्यात!

 


अरणगावमधील अनधिकृत गोडाऊनवर तातडीने कारवाई करा – संग्राम शेळके यांचा इशारा

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत फटाका गोडाऊनना आग लागून शेकडो जीवांची राखरांगोळी झालेली असतानाही प्रशासन अजूनही धाडसी कारवाई करण्याऐवजी डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. अहमदनगर तालुक्यातील अरणगाव येथेही असेच अनधिकृत दुमजली फटाका गोडाऊन बिनधास्तपणे उभारण्यात आले असून, परिसरातील नागरिकांच्या डोक्यावर अक्षरशः मृत्यूचा सापळा लटकवण्यात आला आहे.

शिवसेना (शिंदे गट) चे उपजिल्हाप्रमुख संग्राम शेळके यांनी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना निवेदन देऊन या बेकायदेशीर गोडाऊनची तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नगररचनाकारांनी फक्त 14 प्लॉट्स साठी गोडाऊन परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात 79 अनधिकृत गोडाऊन उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट, बांधकाम परवानगी – यापैकी एकही प्रक्रिया पूर्ण न करता हे गोडाऊन बिनधास्तपणे चालू ठेवण्यात आले आहेत. यामध्ये एक्सप्लोझिव्ह ॲक्टचे आणि नगररचना विभागाच्या अटींचे सर्रास उल्लंघन झालेले आहे.

फटाके हा प्रचंड ज्वलनशील माल असल्याने जरा सी ठिणगी पडली तरी संपूर्ण परिसर उद्ध्वस्त होऊ शकतो. याआधीच धाराशिवमधील दुर्घटनेत अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. अशा पार्श्वभूमीवर अरणगावमधील हे अनधिकृत गोडाऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप होत आहे.

संग्राम शेळके यांनी इशारा दिला की,“प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे.  जीव गेल्यावर कारवाई करणारे प्रशासन आम्ही खपवून घेणार नाही.”

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post