पालकमंत्र्यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी नियुक्तीपत्रांचे वाटप!
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – राज्य शासनाने जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून गट 'क' मध्ये ६७ व गट 'ड' मध्ये ११४ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती देण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जिल्ह्यातील विविध विभागांसाठी १०९ उमेदवारांची लिपिक पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे. अशा एकूण २९० उमेदवारांना ४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वाटप करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमास जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गती दिली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, तहसीलदार (महसूल) शरद घोरपडे यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी भरपूर परिश्रम घेतले. यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी शिफारस केलेल्या गट 'क' व गट 'ड' मधील सर्व उमेदवारांची महसूल विभागामार्फत कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया मागील महिन्यातच पूर्ण करण्यात आली. पडताळणीनंतर उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार उपलब्ध विभाग व रिक्त जागांवर उमेदवारांची शासकीय नोकरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या उमेदवारांची संबंधित विभागांनी कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली असून अशा उमेदवारांनाही दि. ४ ऑक्टोबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा उपक्रम राबविण्यामागील मुख्य उद्देश आहे, असे जिल्हाधिकारी आशिया यांनी सांगितले.
Post a Comment