06 आरोपी अटक, 4.23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत – 25 लाखांचा कॉपर चोरीचा गुन्हा
माय नगर वेब टीम
कर्जत/अहिल्यानगर :अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून 4 लाख 23 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
🔹 प्रकरणाची पार्श्वभूमी
२२ सप्टेंबर रोजी फिर्यादी दिपक शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे गाव शिवारातील तुकाई चारी लिफ्ट इरिगेशन सब स्टेशनमध्ये हायराझर कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे 25 लाख 72 हजार रुपयांचे कॉपर कोर व ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरले होते. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🔹 कारवाईचे तपशील
मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील मालाविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयितांवर पाळत ठेवली. तपासात हा गुन्हा मच्छिंद्र रामदास काळे (रा. नवसरवाडी) व त्याच्या साथीदारांनी केल्याचे उघड झाले.
पथकाने घरावर छापा टाकून मच्छिंद्र काळे, त्याचा मुलगा सागर काळे, श्याम पवार, विष्णु पवार, किशोर पवार (रा. सोलापूर), व राजकुमार भोपळे (रा. धाराशिव) यांना अटक केली. या टोळीतील सचिन पवार, शिवाजी पवार व प्रविण उर्फ पवन पवार हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
🔹 जुने गुन्हेगार
आरोपी किशोर खेलु पवार हा सराईत असून त्याच्याविरुद्ध सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी व चोरीचे तब्बल 13 गुन्हे दाखल आहेत.
🔹 पुढील तपास
सर्व अटक आरोपींना कर्जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोनि किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
Post a Comment