शहर विकासासाठी एकता, अहिंसा, शांतता आवश्यक : खासदार निलेश लंके

 


माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : नगर शहरात मागील काही काळात जातीय तणावाच्या घटना घडत असल्याने सामाजिक वातावरण आणि अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे. बाजारपेठेत मरगळ, करसंकलनात घट आणि गुंतवणुकीत कमतरता दिसून येत आहे. अशा स्थितीत एकतेचा, शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देत खासदार निलेश लंके यांनी “स्वच्छ भारत – एकतेचा संकल्प” या अभियानाची सुरुवात केली.

     महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त तसेच विजयादशमीच्या पावन दिवशी वाडिया पार्क येथील गांधी पुतळ्यापासून अभियानाची सुरुवात झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, समाजसुधारक वस्ताद लहुजी साळवे, शहीद भगतसिंग, हुतात्मा करवीर चौथे छत्रपती, स्वामी विवेकानंद, आनंदधामातील समाधी स्थळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशा अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

     या उपक्रमात माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक योगीराज गाडे, गिरीश जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण, शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख किरण काळे, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, संजय गारुडकर, अशोक बाबर, मंदार मुळे, संजय झिंजे, दत्ता कावरे, सुनील त्रिपाठी, सिताराम काकडे, अल्ताफ शेख, विशाल वालकर, निलेश मालपाणी, सुनील सोनवणे, सुनील क्षेत्रे, नलिनी गायकवाड, कांता बोठे, प्रियंका दिवटे यांसह विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक, महिला मंडळे, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी तसेच नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

     माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे या अभियानाचा समारोप झाला. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना “समाजातील खरे आरोग्य दूत” म्हटले. खासदार निलेश लंके म्हणाले,  “स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठी आवश्यक नाही, तर ती सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. गांधीजींच्या विचारांतून आपण सत्य, अहिंसा आणि एकतेचा मार्ग स्वीकारावा. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महापुरुषांना अभिवादन केले आहे, ही समाजातील जागरूकतेची खूण आहे.”

एकतेचा संकल्प – विकासाचा मार्ग

खासदार लंके यांनी शहरातील जातीय तणावाविषयी चिंता व्यक्त करत सांगितले की, “शहराचा विकास हवा असेल तर एकता आणि शांततेचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे.”

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post