अयोग्य विषयक उपाययोजनांसह कॅम्प लावून आरोग्य तपासणी व उपचार करावेत
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - रविवारी शहरातील सीना नदीलगतच्या परिसरातील अनेक वसाहतींमध्ये पुराचे पाणी शिरले होते मालेगाव व स्टेशन रोडवरील अमरधाम स्मशानभूमीतही पुराचे पाणी शिरल्याने सर्वत्र गाळ, घाण साचून अस्वच्छता झाली होती. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन व आरोग्य विभागामार्फत या सर्व परिसरांमध्ये स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे अमरधाम स्मशानभूमीमध्ये साफसफाई करण्यात आली आहे. पूरस्थिती निर्माण झालेल्या भागात भविष्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. प्रसंगी कॅम्प लावून परिसरात नागरिकांची तपासणी व उपचार करावेत, असे निर्देशही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत.
शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी मध्य शहरातील कल्याण रोड परिसरात, तसेच बोल्हेगाव, नागापूर, स्टेशन रस्त्यावरील काही भागात, पुणे रोडवरील विनायक नगर परिसरात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. वसाहतींमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून आलेला कचरा, गाळ व इतर घाण यामुळे परिसरात आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तातडीने महानगरपालिकेने या भागातील साफसफाई व स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. तसेच साथीचे आजार पसरले जाऊ नयेत, या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना, औषध फवारणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
पुराचे पाणी शिरलेल्या परिसरात स्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तसेच पिण्याचे पाण्याची समस्याही निर्माण होऊ शकते. या दृष्टीने संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या आरोग्य केंद्रामार्फत परिसरात घरोघरी सर्वेक्षण करून रुग्णांची माहिती घ्यावी. वेळप्रसंगी परिसरातच कॅम्प लावून नागरिकांची तपासणी व उपचार करावेत. त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या कराव्यात. परिसरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे व वापरण्याच्या पाण्याचे साठे तपासावेत, असे निर्देशही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत.
दरम्यान, पूर परिस्थितीमुळे नेप्ती नाका परिसर, दातरंगे मळा, वारुळाचा मारुती रोड या ठिकाणी झालेल्या नुकसानीची व परिस्थितीची आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. अमरधाममध्ये पुरामुळे आलेला सर्व गाळ हटवण्यात आला असून, वारुळाच्या मारुती येथे पुलाजवळील रस्ता खचला व पाण्याची लाईन नादुरुस्त झाली होती, ती त्वरित दुरुस्त करण्यात आली आहे. रस्त्यांवरचे खड्डे देखील या परिसरातील बुजवण्यात आल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले.
Post a Comment