हिवरे बाजारमध्ये पाण्याचा ताळेबंद जाहीर : भविष्यासाठी २.६८ कोटी लिटर पाणी राखीव, सलग २१ व्या वर्षी परंपरा कायम



माय नगर वेब टीम

   अहिल्यानगर :   आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्ताने ७ व्या माळेच्या दिवशी मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन २०२५-२६ चा पाण्याचा ताळेबंद सादर करण्यात आला. नवरात्र उत्सवात पाण्याचा ताळेबंद सादर करण्याची ही परंपरा सलग २१ व्या वर्षीही कायम ठेवण्यात आली. 

          या ग्रामसभेला आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, सरपंच विमलताई ठाणगे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन छबुराव ठाणगे, सेवा सोसायटीचे चेअरमन रामभाऊ चत्तर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          दरम्यान, यशदा पुणे येथे जागतिक नदी दिना निमित्त आयोजित “नदीसाठी युवा शक्ती” या कार्यक्रमात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, यशदा महासंचालक सुधांशु कुमार, उपमहासंचालक डॉ. शेखर गायकवाड, अतिरिक्त महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत हिवरे बाजार गावाचा सन २०२५-२६ चा पाण्याचा ताळेबंद प्रकाशित करण्यात आला.

          यावेळी पद्मश्री पवार यांनी सांगितले की, सन १९९५ पासून हिवरे बाजार येथे पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जात असून सुरुवातीला फक्त एकच पर्जन्यमापक होता. मात्र सन २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसविल्याने ताळेबंद अधिक अचूक तयार होऊ लागला.     

          यंदाच्या पाण्याच्या ताळेबंदानुसार यावर्षी २४ दिवसांत एकूण ५२४ मि.मी. पाऊस झाला असून त्यातून ५११.८६ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यापैकी गावाच्या वापरासाठी ३४२.५४ कोटी लिटर पाणी उपलब्ध असून गावाच्या विविध वापरासाठी वार्षिक गरज ३३९.८६ कोटी लिटर इतकी आहे. त्यात लोकसंख्या व जनावरांसाठी पिण्याचे पाणी ७.७१ कोटी लिटर, खरीप पिकांसाठी १३२.८० कोटी लिटर, रब्बी पिकांसाठी १२६.५ कोटी लिटर, उन्हाळी पिकांसाठी (प्रस्तावित) २४ कोटी लिटर, बारमाही पिकांसाठी ४२ कोटी लिटर व इतर वापरासाठी ६.८५ कोटी लिटर अशी गरज असून एकूण ३२५.३१ कोटी लिटर पाणी आवश्यक आहे. याशिवाय भविष्यासाठी २.६८  कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आदर्श गाव हिवरे बाजार गावाचे जल अंदाजपत्रक सन २०२५-२६

अ.नं. तपशील सन २०२५-२६ पाऊसमान

गाव शिवारात पडलेले एकूण पाऊस ५२४ मी.मी.

पावसाचे एकूण दिवस २४ दिवस

पावसाद्वारे उपलब्ध झालेले एकूण पाणी ५११.८६ कोटी लिटर

अ) उपलब्ध पाण्याचे वर्गीकरण 

१)बाष्प होऊन हवेत परत जाणारे पाणी १७९.१५ कोटी लिटर

२)वाहून जाणारे पाणी ४०.९५ कोटी लिटर

३)जमिनीत मुरणारे पाणी ८७.०२ कोटी लिटर

४)मातीत मुरणारे पाणी १५६.५६ कोटी लिटर

५)जमिनीवर साठणारे पाणी ५१.१९ कोटी लिटर

६)जलसंधारण कामामुळे मुरणारे अधिकचे पाणी ५०.७८ कोटी लिटर

ब) गावाच्या वापरासाठी उपलब्ध पाणी (जमा) ३४२.५४ कोटी लिटर

क) गावाच्या विविध वापरासाठी वार्षिक गरज(खर्च) ३३९.८६ कोटी लिटर

१)पिण्यासाठी आवश्यक पाणी (लोकसंख्या+जनावरे संख्या) ७.७१ कोटी लिटर

२)शेतीसाठी आवश्यक (खरीप+रब्बी+उन्हाळी+बारमाही) ३२५.३१ कोटी लिटर

३)इतर वापरासाठी आवश्यक पाणी ६.८५ कोटी लिटर

ड) भविष्यासाठी राखीव ठेवावयाचे पाणी=एकूण उपलब्ध पाणी (अ)-आवश्यक पाणी(ब) २.६८ कोटी लिटर

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post