लाड पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे तांत्रिक बाबींमुळे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा : अनुसूचित जाती आयोग सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर – सफाई कामगारांच्या हक्कासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या लाड पागे समितीच्या शिफारशीअंतर्गत महानगरपालिकेमध्ये तांत्रिक बाबींमुळे प्रलंबित असलेली नियुक्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढून कामगारांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी दिले.

महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ॲड. लोखंडे बोलत होते. बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, सहायक आयुक्त मेहेर लहारे, आरोग्य अधिकारी डॉ. राजुरकर, कनिष्ठ अभियंता आदित्य बल्लाळ, कामगार अधिकारी धनंजय शित्रे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. लोखंडे म्हणाले, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन व सवलती द्याव्यात, कामगारांना किमान वेतन मिळेल याची दक्षता घ्यावी. सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क आदी सुरक्षा साधने तात्काळ पुरवावीत. कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत लाभ देण्यात यावा. शहरातील झोपडपट्टी भागात आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचनाही ॲड. लोखंडे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी श्री. लोखंडे यांनी महानगरपालिकेस प्राप्त होणाऱ्या महसुलाच्या एकूण ५ टक्के निधीतील आस्थापना खर्च व आर्थिक दुर्बल घटकांवरील तरतुदींचा मागील पाच वर्षांचा आढावा व कामाची तपासणी केली. तसेच लाड पागे समिती, दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे सुधार योजना व अनुकंपा भरतीबाबतही उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

शासकीय विश्रामगृहात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा घेतला आढावा

शासकीय विश्रामगृह, अहिल्यानगर येथे जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग तसेच सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावाही श्री. लोखंडे यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त श्री. खांडकेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. लोखंडे यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, दलित सुधार योजना या योजनांबरोबरच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागृतीबाबतच्या कार्याचा विस्तृत आढावाही घेतला.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post