माय नगर वेब टीम
अहिल्यानगर :- प्रशासन अधिक लोकाभिमुख व पारदर्शी होण्यासाठी माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शासकीय विभागांनी पार पाडावी, असा सूर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून उमटला.
दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी २८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने आज दि. २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करून माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार शरद घोरपडे, प्रमुख व्याख्याते प्रवीण जिंदम यांच्यासह सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सामान्य नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याकडे जागरूक नागरिक म्हणून पाहावे. व्यापक लोकहित लक्षात घेऊन शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेला माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रमुख व्याख्याते प्रवीण जिंदम यांनी केले. त्यांनी अधिनियमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमास विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment