कोपरगाव व राहाता तालुक्यातील गावातील नुकसानीची पाहणी
माय नगर वेब टीम
शिर्डी - पीक पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणारच आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कुटुंबात झालेली जिवितहानी, घरांची पडझड, पशुधन हानी याची भरपाई म्हणून तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.
कोपरगाव व राहाता तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या चांद कसारे, कोकमठाण, रूई, शिर्डी, अस्तगाव या गावातील शेतपीके व नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, शिर्डी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार हेमंत पाटील, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्यातील चांदकसारे येथे सोयाबीन शेत पीके, कोकणठाण येथे जगन्नाथ लोंढे, शिवाजी रक्ताटे, दगूनाथ गायकवाड, संजय लोंढे आदी शेतकऱ्यांशी संवाद साधत सोयाबीन, मका , ऊस या पीकांच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. राहाता तालुक्यातील रूई गावातील संजय वाबळे, सुरेश शेळके, भास्कर वाबळे आदी शेतकऱ्यांच्या सोयाबीन व ऊस पीक क्षेत्राच्या नुकसानीची माहिती घेतली. शिर्डीतील बिरोबा रस्त्यावरील सोयाबीन पीक क्षेत्राची पाहणी करून बाबासाहेब कोते, चांगदेव धुमसे , ज्ञानेश्वर धुमसे या शेतकऱ्यांशी संवाद साधला. अस्तगाव शिवारातील गुलाब फुल शेती तसेच गोर्डे वस्तीत पाणी शिरून झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.
या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात विभागीय आयुक्तांनी पीक पंचनामे, ई-पीक पाहणी, बाधित क्षेत्र, पीक विमा योजना, अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आदी माहिती प्रशासनाकडून जाणून घेतली.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची कार्यवाही करण्यात यावी. आवश्यक असल्यास स्थानिक नागरिक, शेतकऱ्यांचा सहकार्य घेण्यात यावे, अशा सूचना ही डॉ. गेडाम यांनी यावेळी दिल्या.
Post a Comment