माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे तत्वज्ञान मानवी विकास व राष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे विचार युवापिढीपर्यंत पोहोचले तर विकसित भारताचे स्वप्न निश्चित साकार होईल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
विळदघाट येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ऑडिटोरियम येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन व्याख्यान हिरक महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीमार्फत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते.
बैठकीस आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, समिती सदस्य विनायकराव देशमुख, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अजय आगरकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, अनिल मोहिते, दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या ‘एकात्म मानव दर्शन’ या विचारांचे हिरक महोत्सवी वर्ष राज्यभर साजरे होत आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करून हे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने उपक्रम राबवले जात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विकास प्रक्रियेत शासनाच्या प्रत्येक धोरणात, निर्णय प्रक्रियेत व लोककल्याणाच्या अमलबजावणीत अंत्योदय चळवळीचे प्रतिबिंब दिसते. मानवी कल्याणाबरोबर राष्ट्राच्या प्रगतीलाही त्यांच्या विचारांचे बळ मिळते. हा विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, एकात्म मानव दर्शनाकडे केवळ विचार म्हणून न पाहता मानवी तत्वज्ञान म्हणून स्वीकारले पाहिजे. प्रत्येकाने हा विचार आपल्या दैनंदिन जीवनात उतरवला तर सामाजिक विकासाचे ध्येय गाठणे शक्य होईल. राज्यात आपला जिल्हा या उपक्रमाच्या अंमलबजावणीत अग्रेसर असून सर्व शाळा व महाविद्यालयांना यात सहभागी करून उपक्रम अधिक यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले की, पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे विचार विविध उपक्रमांतून सर्वदूर पोहोचविण्यासाठी समितीमार्फत प्रभावी काम होत आहे. आतापर्यंत २० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला असून जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी विकास समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य दिले. हीच भूमिका प्रशासनाची आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आयुष्यभर उपेक्षितांच्या कल्याणासाठी कार्य केले व स्वदेशीचा विचार पुढे नेला. व्यापक विचारसरणी व कृतीतून त्यांनी लोककल्याणासाठी कार्य केले. त्यांच्या विचारांचे प्रसारण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींपर्यंत विविध उपक्रमांद्वारे पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहील.
समिती सदस्य विनायकराव देशमुख म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली अंत्योदयची संकल्पना जिल्ह्याच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरते. त्यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत यासाठी समिती सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
बैठकीस जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment