राहाता येथे नगरपरिषद, बाजारसमित्यांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन व शुभारंभ
माय नगर वेब टीम
शिर्डी - आज घरबसल्या राज्यातील नावाजलेल्या बाजार समित्यांमधील कृषी मालाचे दर शेतकऱ्यांना ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. डिजिटल युगाच्या स्पर्धेत राहण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून या सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता नगरपरिषदेच्या शासकीय विश्रामगृह इमारतीचे (७.५ कोटी) भूमिपूजन, गोदावरी उजवा तट कालवा कार्यालय, अधिकारी-कर्मचारी निवासस्थान, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या कांदा मार्केटचा शुभारंभ, शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे,जिल्हा उपनिबंधक मंगेश सूर्से, राहाता नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव लोंढे, गटविकास अधिकारी विवेक गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती ६०० कोटी रुपयांची उलाढाल करते, हे राज्यासाठी आदर्श आहे. शेतकऱ्यांच्या कृषी मालास उत्तम भाव देण्याची परंपरा या बाजार समितीने कायम ठेवली आहे.”
“शासनाने गोदावरी उजवा तट कालव्याच्या दुरुस्तीसाठी १९१ कोटी रुपये, तसेच चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आणखी २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी नदी खोऱ्यात आणण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. यामुळे या खोऱ्यातील शेती सुजलाम-सुफलाम होईल.”
“महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात पहिल्यांदा जलसंपदा प्रकल्पांसाठी ५३३ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहेत. यंदा झालेल्या जास्त पावसामुळे १०२ टीएमसी क्षमतेचे जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. यातून ९५ टीएमसी पाणी वाहून गेले आहे. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी शासन प्राधान्याने काम करत आहे. भंडारदरा धरणात अतिरिक्त दहा टीएमसी पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे निळवंडे धरणही पूर्णपणे भरेल. योग्य नियोजनामुळे जिल्ह्यातील सर्व पाटचाऱ्या दुधी भरून वाहत आहेत. पुढील पिढीला दुष्काळाचा सामना करावा लागू नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.”
ते म्हणाले, “अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करत आहे. अशा पार्श्वभूमीवर नागरी सत्कार घेणे योग्य नाही,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री म्हणून गोदावरी उजवा तट कालव्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची व विकासकामांच्या चित्रफित दाखविण्यात आली. कांदा, डाळिंब आणि भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविकात ज्ञानदेव चौधरी यांनी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.
Post a Comment