माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी जिल्ह्यातील परिवहन विभागाकडून मागील सहा महिन्यांतील वाहनांवरील कारवाई व आकारलेल्या दंडाचा सविस्तर तपशील तातडीने सादर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या वाहनांवर होत असलेल्या कथित अवास्तव दंडात्मक कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी विभागाला थेट इशारा दिला आहे.
खासदार लंके यांच्या कार्यालयाकडे गेल्या काही महिन्यांत सातत्याने तक्रारी येत असून, शेतमालाची बाजारपेठेत वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, जीप, पिकअप, मिनी-ट्रक यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दंड आकारल्याची माहिती मिळाली आहे. कष्टाने पिकवलेला माल बाजारात आणताना शेतकऱ्यांना आधीच निसर्गाच्या संकटांचा सामना करावा लागतो; त्यातच वाहतुकीदरम्यान दंडात्मक कारवाई केल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या त्रस्त होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिवहन विभागात कथित कार्ड सिस्टम सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या असल्याचे खा. लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे. या संदर्भात ते लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
खा. लंके यांनी नगर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत आणि जामखेड या आठ तालुक्यांमध्ये मागील सहा महिन्यांत झालेल्या सर्व कारवायांचा तपशील देण्याची मागणी केली आहे. त्यात वाहनाचा प्रकार, कारवाईची संख्या, आकारलेला दंड, संबंधित कायदा व नियम यांचा समावेश आहे.
हा तपशील संसदीय कामकाजासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे खा लंके यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Post a Comment