प्रशासनाच्या मदतीने १३१ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर !
अहिल्यानगर : जिल्ह्यात २२ सप्टेंबर रोजी सायंकाळपासून ते २३ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व कर्जत तालुक्यांमध्ये ओढे-नाले व नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या ९१ नागरिकांची महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
बचावकार्याची ठळक माहिती
- जामखेड तालुका : तरडगाव येथे खैरी नदीच्या पुरामुळे दौंडाची वाडी रस्त्यावर अडकलेल्या ७ नागरिकांची सुटका.
- पाथर्डी तालुका : कोरडगाव येथे १५ तर सोमाठाणे येथे १० नागरिकांना बाहेर काढण्यात आले.
- शेवगांव तालुका : खरडगाव येथे प्रसुती वेदना सुरू असलेल्या महिलेचा कुटुंबासह सुरक्षित बचाव; वरुर येथील १७ नागरिकांची एसडीआरएफ (धुळे) पथकाने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने सुटका केली.
- कर्जत तालुका : खताळ वस्ती व मलठण येथून एनडीआरएफ (पुणे) पथकाने ३८ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले.
अतिवृष्टी झालेली मंडळे
जिल्ह्यातील एकूण ३५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाथर्डी (९), शेवगांव (८), जामखेड (६), अहिल्यानगर (५), कर्जत (३), नेवासा (२), तर श्रीगोंदा व पारनेर (प्रत्येकी १) मंडळांचा समावेश आहे.
नागरिकांचे स्थलांतर
कर्जत व शेवगांव तालुक्यातील निंबोडी, तरडगाव, मलठण, सितपूर, आखेगाव व भगूर या गावांतील १३१ कुटुंबांतील सुमारे ४६५ नागरिक व १४९ जनावरे यांना गावातील शाळा व नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.
धरणांमधून विसर्ग
२३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रमुख धरणांमधून पुढीलप्रमाणे विसर्ग सुरू होता :
- जायकवाडी : ८४,८८८ क्युसेक
- भंडारदरा : ५,५९३ क्युसेक
- मुळा : ७,००० क्युसेक
- घोड : ८,००० क्युसेक
- सीना : २१,०१४ क्युसेक
- खैरी : ५,२३३ क्युसेक
सीना धरणाचा विसर्ग वाढल्यामुळे कर्जत तालुक्यातील निंबोडी, तरडगाव, मलठण तसेच जामखेड तालुक्यातील दिघी, फक्राबाद व चोंडी गावांमध्ये पाणीपातळी वाढत असून प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे.
इतर घडामोडी
- अहिल्यानगर शहरातील कल्याण रोडवरील नवीन पुलालगतचा रस्ता पाण्याखाली; वाहतूक बंद करून पर्यायी मार्गांचा वापर सुरू.
- पाथर्डी तालुक्यात २० सप्टेंबर रोजी शिरपूर येथे वाहून गेलेल्या अतुल रावसाहेब शेलार यांचा मृतदेह आज तिसगाव शिवारात आढळला.
सद्यस्थितीत एनडीआरएफचे पुणे पथक कर्जत तालुक्यात, तर एसडीआरएफचे धुळे पथक पाथर्डी तालुक्यात तैनात असून जिल्हा प्रशासनाने सतत लक्ष ठेवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
Post a Comment