टपऱ्या, पत्राचे शेड पथकाने कारवाई करून हटवले
नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत, अन्यथा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - रामवाडी, कोठला परिसरात असलेल्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. अनधिकृत पत्रा शेड, तसेच टपऱ्या महानगरपालिकेने कारवाई करून हटवल्या. काही महिन्यांपूर्वी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर अतिक्रमणधारक पुन्हा रस्त्यावर आल्याने महानगरपालिकेच्या पथकाकडून कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपअभियंता सुरेश इथापे, प्रभाग अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, अर्जुन जाधव यांच्या पथकाने अतिक्रमणांवर कारवाई केली. रामवाडी परिसरातून कारवाई सुरू करण्यात आली. कोठला परिसरात रस्त्यावर लावण्यात आलेल्या टपऱ्या, पत्रा शेड, लोखंडी अँगल कारवाई करून काढण्यात आले.
शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार आहे. रस्त्यावरील अतिक्रमणांसह आता महानगरपालिकेच्या जागा व ओपन स्पेसवर असणाऱ्या अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी रस्त्यावर किंवा महानगरपालिकेच्या जागेत अतिक्रमणे केली असतील, ती तत्काळ स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिका कारवाई करून अतिक्रमणे जमीनदोस्त करेल. कारवाईत संबंधित अतिक्रमण धारकाचे नुकसान झाल्यास त्याला महानगरपालिका जबाबदार असणार नाही, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.
Post a Comment