माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : शिर्डी परिसरातील सावळीविहीर (बु) येथील के.के. मिल्कजवळील दगडाच्या खाणीत दोन वर्षांपूर्वी सापडलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सुत्रे हाती घेऊन आरोपीपर्यंत पोहोचत त्याला जेरबंद केले.
📌 घटनेचा तपशील
दिनांक 19 मार्च 2024 रोजी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाणीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला याची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
📌 तपासाचा धागा
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील न उघड खुनांच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केले होते. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आकाश मोहन कपिले (वय 28, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
📌 खुनामागचे कारण
मृत महिला शिर्डी बसस्थानक परिसरात भिक्षा मागत असे. आरोपीला ती "तु माझा नवरा आहे" असे म्हणत असे. यामुळे इतर लोक त्याची खिल्ली उडवत असल्याने आरोपी रागावला. आपल्या वाढदिवशी 17 मार्च 2023 रोजी त्याने डिओ मोपेडवरून महिलेचा सावळीविहीर परिसरातील खाणीत नेऊन गळा आवळून खून केला व प्रेत टाकले.
📌 कारवाई
आरोपीविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 201 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
👉 ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
Post a Comment