दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि महानगरपालिकेच्या वतीने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. महावीर कलादालन येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित व महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर रेखाटण्यात आलेली विविध चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहे. नगरकरांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले. हे प्रदर्शन 26 सप्टेंबर पर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की, या प्रदर्शनात देशभरातील नामांकित कलाकारांच्या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासाला सजीव आकार देण्यात आला आहे. देशभरातील सुमारे २०० कलाकारांपैकी निवडलेल्या ५३ चित्रांचे येथे दर्शन घडत आहे. या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती, इतिहास व परंपरेचे विविध पैलू प्रकट होतात.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांनी सांगितले की, कलाकारांनी देवी अहिल्याबाई होळकरांची शिवभक्ती, समाजातील स्त्रियांच्या शिक्षणासाठीचे प्रयत्न, सतीप्रथेचा विरोध आणि माहेश्वरी साड्यांच्या हातमागाला प्रोत्साहन अशा विविध विषयांना कॅनव्हासवर प्रभावीपणे साकारले आहे. ही सर्व कलाकृती रायपूर येथे संस्कार भारतीच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत साकारल्या गेल्या. एका चित्रात देवी अहिल्याबाई घाटावर हातात शिवलिंग धरून उभ्या असल्याचे दर्शन घडते, तर दुसऱ्या चित्रात सतीप्रथेचा विरोध ठळकपणे मांडलेला आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या कलाग्रामात साधूंची साधना, अपार भक्तांची गर्दी आणि अध्यात्मिक वातावरण या विविध छटा कलाकारांनी आपल्या कलाकृतींमधून सुंदरपणे व्यक्त केल्या आहेत. या चित्रांकडे पाहताना प्रेक्षकांना जणू प्रयागराजच्या कुंभनगरीत उभे असल्याचा अनुभव येतो.
या प्रदर्शनाला कला प्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने पाहणी केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे त्यागमय, सेवाभावी व जनकल्याणकारी कार्य तसेच महाकुंभाची अद्वितीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक छटा अनुभवण्याची संधी या प्रदर्शनातून प्रेक्षकांना मिळाली. यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे, गजानन शेळके (विभाग प्रमुख), दिपक पाटील (वरिष्ठ लेखाधिकारी), सहायक आयुक्त मेहेर लहारे, प्रसिध्दी अधिकारी शशिकांत नजन, शेखर देशपांडे उपस्थित होते.
Post a Comment