माय नगर वेब टीम
अहिल्यानगर: "माझ्याशी लग्न करा, नाहीतर दोन कोटी रुपये द्या, पैसे न दिल्यास तुमच्यावर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करून नोकरी घालवेल," अशी धमकी देत एका महिला मॉडेलने पोलीस निरीक्षकालाच हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्योतीश्री नायक (रा. कोलकत्ता, हल्ली मुंबई) नावाच्या मॉडेलवर खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची आणि ज्योतीश्री नायक यांची ओळख मुंबईतील एका हॉटेलमध्ये झाली होती. दराडे यांच्या मेव्हण्याच्या मालकीच्या या हॉटेलमध्ये ज्योतीश्री नोकरीला होती. सुरुवातीला कामाच्या निमित्ताने ओळख झाली आणि नंतर त्यांच्यात संवाद वाढला. ज्योतीश्रीने मॉडेलींग क्षेत्रात काम करत असल्याचे आणि आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगून दराडे यांच्याकडून वेळोवेळी मदत घेतली. दराडे यांनी तिला आतापर्यंत सुमारे २ लाख १० हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सुरुवातीला मदतीच्या नावाखाली पैसे घेतल्यानंतर ज्योतीश्रीने दराडे यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करण्यास सुरुवात केली. तिने दराडे यांना "आपको पता है ना मै हनीट्रॅप भी कर सकती हू," अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. प्रकरण वाढत जाऊन तिने थेट दोन कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामी करण्याची आणि नोकरी घालवण्याची धमकी दिली.
या प्रकरणाचा कळस तेव्हा झाला जेव्हा ज्योतीश्री नायक दिनांक १६ सप्टेंबर रोजी थेट कोतवाली पोलीस ठाण्यात दराडे यांच्या चेंबरमध्ये पोहोचली. तिने सर्वांसमोर दराडे यांना "एक तर माझ्याशी लग्न करा, नाहीतर मला दोन कोटी रुपये द्या," अशी मागणी केली. दराडे यांनी नकार देताच तिने तिथेच तमाशा करण्याची आणि बलात्काराची केस दाखल करण्याची धमकी दिली. तिने व्हॉट्सॲपवर देखील सतत पैशांची मागणी केल्याचे पुरावे दराडे यांनी पोलिसांना सादर केले आहेत.
विशेष म्हणजे, ज्योतीश्री नायक हिने यापूर्वीच तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दराडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीनंतर दराडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत घडलेला सर्व प्रकार त्यांच्यासमोर मांडला. चौकशीअंती दराडे यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली असून, कॅम्प पोलिसांनी ज्योतीश्री नायक आणि तिला मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दुहेरी तक्रारींमुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, पोलीस दोन्ही बाजूने अधिक तपास करत आहेत.
Post a Comment