अहिल्यानगर :
अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरने मोठी कारवाई करत 11.083 किलो गांजा व स्कॉर्पिओ वाहनासह एकूण 13 लाख 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एक आरोपी फरार आहे.
मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोनि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चार तरुण शेवगाव येथून गांजा खरेदी करून विक्रीसाठी पुण्याकडे जात आहेत. पथकाने पाथर्डी पोलिसांच्या मदतीने माळी बाभुळगाव फाटा येथे सापळा रचून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीला अडवले.
तपासणीदरम्यान वाहनाच्या डिकीमध्ये निळ्या रंगाच्या बॅगेत दोन पिशव्यांत गांजा आढळला. या गांजाचे वजन 11.083 किलो असून किंमत 13,70,500 रुपये इतकी आहे. ताब्यातील आरोपींची नावे सतिष सुरेश डोळस (27), राकेश सुदाम वाळुंज (35), आकाश देविदास जंगम (29), सतिष कृष्णकुमार बिडलांग (33) सर्व रा. मावळ, पुणे अशी आहेत. त्यांनी सदर गांजा हा सुरज आसराजी छाजेड (रा. बालमटाकळी, शेवगाव) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. सुरज छाजेड हा आरोपी सध्या फरार आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. बाळासाहेब खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम 8 (क), 20(ब), ii(ब) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.
Post a Comment