माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - हिंदुत्व युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील नालेगाव येथे आयोजित भव्य जंगी निकाली कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेला डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देवून मल्लांचा उत्साह वाढवत आखाड्यात बसून कुस्तीचा थरार अनुभवला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची उपस्थिती. इतर मान्यवरांप्रमाणे मांडवात आसन न घेता त्यांनी प्रत्यक्ष आखाड्यात जमिनीवर बसून कुस्तीचा थरार अनुभवला. कुस्तीतील प्रत्येक डावपेच त्यांनी बारकाईने पाहत पैलवानांना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिलं.
या प्रसंगी बोलताना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “गावकुसातील परंपरा, मातीतली ताकद आणि ग्रामीण संस्कृतीच खरी भारताची ओळख आहे. अशा कुस्ती महोत्सवातून तरुणाईला प्रेरणा मिळते.”
कुस्ती स्पर्धेमध्ये विविध वजनगटांतील अनेक चुरशीच्या लढती रंगल्या. अंतिम टप्प्यातील सामने पाहण्यासाठी संपूर्ण आखाडा हाऊसफुल्ल झाला होता. विजेत्या पैलवानांचा सन्मानही या वेळी करण्यात आला.
डॉ.सुजय विखे पाटील यांनी ग्रामसंस्कृतीशी असलेली आपली नाळ दाखवत, राजकीय गाजावाजा न करता सरळ मातीशी एकरूप होण्याचा आदर्श घालून दिला.गावपातळीवरील लोककला, परंपरा आणि उत्सव यांना प्रोत्साहन देणारे लोकप्रतिनिधीच खरे ‘जनतेचे’ नेते ठरतात, हे या प्रसंगातून स्पष्ट झाले.
Post a Comment