शालेय विद्यार्थ्यांनी शहरात स्वच्छता दूत म्हणून काम करावे - आयुक्त यशवंत डांगे



 अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने भुतकरवाडी महालक्ष्मी उद्यान परिसरात डेंगू मुक्त अभियान उत्साहात संपन्न

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : डेंगू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार डासांमुळे होत असून, यावर मात करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शहरात डेंगू मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला मोठे यश आले आहे. स्वच्छ पाण्यामध्ये डासांची अंडी आणि अळी तयार होत असल्यामुळे नागरिकांनी आपल्या घरापासूनच सुरुवात करून डेंगू मुक्त नगर शहर घडवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शालेय पातळीवर दूत म्हणून काम करून जनजागृती केली. केशव गाडीलकर शाळेतील विद्यार्थिनींनी स्वच्छतेमध्ये भाग घेऊन लोकांमध्ये जनजागृतीचे प्रभावी काम केले आहे. एडिस इजिप्ती हा डेंगूचा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो, व त्यातून डासांची उत्पत्ती होते. ही साखळी तोडण्यासाठी साठवलेले पाणी नष्ट करून परिसराची स्वच्छता राखणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.

          अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने भुतकरवाडी महालक्ष्मी उद्यान परिसरात डेंगू मुक्त अभियान उत्साहात पार पडले. यावेळी नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणीसाठ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, माजी नगरसेविका वंदनाताई ताठे, पल्लवी जाधव, प्रभाग अधिकारी निखिल फराटे, मुख्याध्यापक अनिल गायकवाड, रिबिका घागरे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. सृष्टी बनसोडे, डॉ. आरती ढापसे, दौलत मुढे, आदिसह स्वच्छता कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आशा सेविका, सामाजिक संस्था, शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामध्ये महिलांचा आणि वृद्ध नागरिकांचा देखील सहभाग लक्षणीय होता. आशा सेविकानी पथनाट्य सादर करून जनजागृती घडवली.

        माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, डेंगू मुक्त शहर करायचे असेल तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे हीच खरी जबाबदारी आहे. सेविकांचे आरोग्यविषयक कार्य समाजात खूप मोलाचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे, त्यानुसार आपणही वाटचाल केली पाहिजे.

         माजी उपमहापौर अनिल बोरुडे म्हणाले की, आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे म्हणून जे प्रयत्न सुरू केले आहेत, ते निश्चितच कौतुकास्पद आहेत. प्रत्येक घरात पोहोचून डेंगूविषयी माहिती देणे ही महापालिकेची नवी ओळख बनली आहे.

         रवींद्र बारस्कर म्हणाले की, महानगरपालिकेने सुरू केलेला डेंगू प्रतिबंधात्मक उपक्रम खूपच अभिनंदनास पात्र आहे. नागरिकांमध्ये डेंगूबाबत घ्यायची काळजी, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय याबाबत माहिती दिली जात आहे, हे फार सकारात्मक आहे.


 अहिल्यानगर शहरामध्ये डेंगू मुक्त अभियानाचा हा सातवा आठवडा असून, हे अभियान सलग २० आठवडे चालणार आहे. नागरिकांनी साठवलेले पाणी दर आठवड्याला रिकामे करून डासांची उत्पत्ती रोखावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभागी होत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता विषयक चित्रकला, भाषण, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. आयुक्त यशवंत डांगे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत डेंगू या आजाराबाबत प्रश्न  केली, आणि विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली यावरून विद्यार्थ्यांमध्ये डेंगू या आजाराबाबत जनजागृती झालेली दिसून आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post