माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात खासदार नीलेश लंके यांनी एक ऐतिहासिक आणि जाज्वल्य मागणी मांडून संसदेत उपस्थितांचे लक्ष वेधले. "अखंड हिंदुस्तानचे राजे" म्हणून गौरवले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आणि त्यांच्या अष्टप्रधान मंडळाच्या स्थापनेचा ऐतिहासिक संदर्भ देत, लंके यांनी रायगड किल्ल्यावर एक दिवसाचे संसदेचे अधिवेशन आयोजित करण्याची आग्रही मागणी केली.
खासदार लंके म्हणाले, "६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. हा क्षण केवळ स्वराज्याची स्थापना नव्हे, तर लोकशाही मूल्यांची मूळ जडणघडण होता. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून महाराजांनी स्वतंत्र खात्यांचे मंत्री नेमले, आणि न्याय, समता, बंधुता व स्वातंत्र्य यांना मूर्त रूप दिलं. जेव्हा संपूर्ण जग हुकूमशाहीत बुडालं होतं, तेव्हा शिवराज्य लोकशाहीचा दीप घेऊन उभं होतं."
शिवाजी महाराजांच्या या अद्वितीय वैचारिक वारशाचा गौरव करण्यासाठी, आणि आजच्या लोकशाही व्यवस्थेला त्या मुळांशी पुन्हा जोडण्यासाठी, रायगड किल्ल्यावर एक विशेष संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी ही केवळ ऐतिहासिक न्याय नाही, तर प्रेरणादायीही ठरेल, असे लंके यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, "महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर समाजसुधारकांनी शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर चालत महाराष्ट्र आणि देशभर सामाजिक क्रांती घडवून आणली. त्यामुळे रायगडावर संसद भरवणं हे त्यांच्या आणि आपल्या लोकशाही व्यवस्थेच्या मुळाशी नतमस्तक होणं ठरेल."
Post a Comment