प्रक्रीया केलेले पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार डॉ विखे पाटील
माय नगर वेब टीम
शिर्डी : घनकचर किंवा सांड पाण्याचे शुद्धीकरण करून शेतकऱ्यांना पाण्याचा . उपयोग होईल असा प्रकल्प देशामध्ये सर्वप्रथम शिर्डी मध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.०, मलनिःसरण प्रकल्पांतर्गत टर्शरी ट्रीटमेंट प्लँट लोकार्पण सोहळ्यानिमित्त डाॅ.सुजय विखे पाटील बोलत होतेे.शिर्डी परिसरात पाण्याची दुरवस्था लक्षात घेता, पुढील आठवड्यात गोदावरी नदीच्या रुंदीकरणाचे १९० कोटींचे काम देखील सुरू होणार आहे. हे काम राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून राबवले जाणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी ठाम भूमिका
चाऱ्यांवर कोणतेही अतिक्रमण असो, नगरसेवक असो की नगराध्यक्ष, शेतकऱ्यांचे पाणी अडवले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगून डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाऱ्यांवरील अनधिकृत अतिक्रमण मुक्तता करण्याचे आश्वासन दिले.
शिर्डीतील बदल: गुन्हेगारीवर कारवाई
मागील एक महिन्यापासून शिर्डीत होत असलेल्या बदलांचे दर्शन घडत आहे. हे कोणत्याही व्यक्ती विरोधातील द्वेषातून नव्हे, तर गुन्हेगारीच्या विरोधातील कार्यवाही आहे. डॉ. विखे पाटील म्हणाले, “जिथे गुन्हेगार, दारू भट्ट्या आहेत, त्यांचा पत्ता सांगा; दुसऱ्या दिवशी तिथे जेसीबी जाईल आणि त्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील.”
अंगणवाड्यांसाठी उच्च दर्जाचा दृष्टिकोन
“आपण ज्या अंगणवाड्या उभारणार आहोत त्या इतक्या दर्जेदार असतील की बंगल्यात राहणारा देखील आपला नातू तिथे पाठवेल,” असे सांगत त्यांनी या अंगणवाड्यांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा निर्धार व्यक्त केला.
थीम पार्क आणि स्मार्ट शिर्डी
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कोटींच्या थीम पार्कची वर्क ऑर्डर कालच मंजूर झाली असून, ते प्रकल्प १०० कोटींपर्यंत नेण्याचा मानस आहे. याशिवाय शिर्डी शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, गुन्हेगारीवर यामुळे नियंत्रण ठेवले जाईल.
व्हीआयपी दर्शनावर ठाम भूमिका – उपोषणाचा इशारा
डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्हीआयपी दर्शनासंदर्भात देखील भूमिका मांडली असून त्यांनी स्पष्ट केले की, सर्व ग्रामस्थांनी व सर्व पक्षांनी मिळून व्हीआयपी दर्शन संदर्भात ठाम भूमिका मांडावी व श्री क्षेत्र तिरुपतीच्या धर्तीवर श्री क्षेत्र शिर्डी येथे काकड आरतीनंतर दोनच तास व्हीआयपी दर्शन चालू व्हावे; तसेच व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली जो धंदा चालू आहे, त्याला कुठेतरी आळा बसवून सर्वसामान्य जनतेला व समस्त साईभक्तांना दर्शन घेण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्वांनी लक्ष घालावे असे आवाहन केले. संस्थानकडे याबाबत येत्या ८ दिवसात निवेदन दिले जाणार असून त्यानंतर संस्थानाला याबाबत पूर्तता करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाईल, त्यानंतर निर्णय न झाल्यास, डॉ. विखे पाटील शिर्डीच्या प्रांगणात उपोषणाला बसतील, असा इशाराही त्यांनी दिला.
गद्दारांवर थेट कारवाईचा इशारा
“विधानसभा निवडणुकीत आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांची नावं मला माहिती आहेत. संघटनेत काम करताना चुका माफ होतील, पण गद्दारी करणाऱ्यांना माफ करणार नाही. व्हॉट्सॲप चॅट, कॉल्स, बैठका – सर्व माहिती माझ्याकडे आहे. कोणीच सुटणार नाही,” असा थेट इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
“नेते कितीही दगाफटका करत असले तरी जनतेच्या मनात फक्त विखे पाटीलच आहेत,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
शिर्डी येथील अंगणवाडी केंद्राचा भूमिपूजन समारंभ संपन्न
दरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी साकोरी शिव व शिर्डी पानमळा शिर्डी कणकुरी रोड येथे भव्य अशा अत्याधुनिक अंगणवाडी शाळेचे भूमिपूजन संपन्न झाले. तसेच शिर्डी बाजार तळाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा उद्घाटन समारंभ देखील संपन्न झाला.
Post a Comment