महंमद महाराज मंदिर जिर्णोध्दाराचा वाद ; जिर्णोध्दारप्रकरणी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी: खासदार नीलेश लंके यांची मागणी

 


माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : शेख महंमद महाराज यांच्या मंदीराच्या जिर्णोध्दारावरून निर्माण झालेल्या वादात तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने दर्गा ट्रस्ट बरखास्त करून या प्रश्नी ठोस भूमिका घेण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी गुरूवारी केली. 

      श्रीगोंदे येथील संत महमंद महाराज यांच्या समाधीस्थळ येथे दर्गा ट्रस्ट स्थापन करण्यात आल्याने वाद निर्माण झाला असून ग्रामस्थांनी त्याविरोधात बंद, मोर्चा तसेच धरणे आंदोलन छेडले आहे. खा. नीलेश लंके यांनी आंदोलकांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 

       पत्रकारांशी बोलताना खा. लंके म्हणाले, महंमद महाराजांच्या जिर्णोध्दाराचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यात्रा कमिटी आणि ट्रस्ट यांच्यात मतभेद असल्याने मंदिराचा जिर्णोध्दार रखडलेला आहे.  ट्रस्टच्या काही लोकांनी यात्रा कमिटीचे काम करणाऱ्या लोकांना गुन्हेगार संबोधण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत त्यांनी प्रशासनास पत्रव्यवहारही केला. या वादानंतर नागरिकांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला. वारकरी सांप्रदायाची परंपरा पुढे नेणारी ही वारकरी मंडळी आहेत. त्यांनी येथे धरणे आंदोलनही सुरू केले आहे.  प्रशासनाने या प्रश्नी तात्काळ ठोस भूमिका घेऊन ट्रस्ट बरखास्त केले पाहिजे. त्यानंतरच पुढील मार्ग निघेल असे खा. लंके म्हणाले. 

         तुम्ही मध्यस्थाची भूमिका घ्याल का असा प्रश्न पत्रकारांनी उपास्थित केला असता खा. लंके म्हणाले, आम्ही मध्यस्थाची भूमिका घेऊच मात्र खरी भूमिका जिल्हाधिकारी, पोलीस दलाने घेतली पाहिजे. आमच्यासारखी मंडळी राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र कायद्याचा धाक असल्याशिवाय या प्रकरणातून मार्ग निघणार नाही असे खा. लंके म्हणाले. 

समाजाच्या भावना लक्षात घेऊन मार्ग काढा 

 या समाजाच्या भावना आहेत. त्या लक्षात घेऊन प्रशासनाने त्यात तात्काळ मार्ग काढला पाहिजे. ट्रस्ट तात्काळ बरखास्त करणे गरजेचे आहे. कोणी कोणाशी बोलायचे ? बंद दाराआड बसायचे यापेक्षा जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाची भूमिका महत्वाची आहे. 

खासदार नीलेश लंके

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post