ग्रामस्थांचे तहसिलदारांना निवेदन | अनधिकृत उत्खनन बंद न झाल्यास रास्तारोकोचा इशारा
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील हिवरे झरे परिसरात बोअर ब्लास्टिंग करुन अनधिकृतपणे राजरोसपणे उत्खनन सुरू आहे. बोअर ब्लास्टिंगमुळे शेतकऱ्यांच्या घरावर दगड पडून पत्र्यांना छिद्र पडले आहे. तसेच बोअरवेलचे पाणी गायब होत असल्याने शेतकऱ्यांवर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. ब्लास्टिंग करुन होत असलेले उत्खनन तात्काळ न थांबविल्यास सात दिवसांच्या आत कोणत्याही क्षणी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसिलदार संजय शिंदे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
हिवरे झरे गावच्या हद्दीमध्ये घोसपुरी रोड परिसरात हिवरे झरे व बाबुड बेंद येथील नागरिकांच्या शेत जमीनी आहेत. तसेच या परिसरात काही लोकही राहतात. हिवरे झरे हद्दीतील गट नंबर 311 व 307 मधील बेकायदेशीर उत्खननाबाबत ग्रामस्थांनी 10 जानेवारी 2025 रोजी महसूल प्रशासनाला निवेदन दिले होते. बोअर ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांचे नुकसान झाले आहे. विहिरी, बोअरवेलचे पाणी गेले आहे. पोल्ट्री शेडचे नुकसान झाले आहे. पशु पक्षी व माणसांना त्रास सहन करावा लागत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तसेच विना नंबरचे ओव्हरलोड डंपरही दिवस रात्र सुसाट धावत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान 3 फेब्रुवारी 2025 रोजी गावच्या हद्दीत डबर खाणींना परवानगी न देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. तरीही हिवरे झरे परिसरात अनधिकृत उत्खनन राजरोसपणे सुरुच असल्याने ते तातडीने बंद करावे अन्यथा रास्तारोको करण्यात येईल असे निवेदन 22 एप्रिल रोजी तहसिलदारांना देण्यात आले आहे. निवेदनावर माजी सरपंच सुरेश काटे, माजी उपसरपंच रोहिदास उदमले, साकळाई कृती समितीचे सदस्य नारायण रोडे, विश्वनाथ चव्हाण, गणेश पवार यांची नावे आहेत.
डबर खाणींना परवानगी न देण्याचा ग्रामसभेत झाला ठराव
हिवरे झरेमध्ये 3 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये गावच्या हद्दीत कोणत्याही डबर खाणींना परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव करण्यात आला आहे. त्या ठरावावर 24 ग्रामस्थांच्या सह्या आहेत. गट नंबर 307 मध्ये ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता बोअर ब्लास्टिंग घेऊन अवजड वाहनाने डबर वाहतूक केली जाते. या ब्लास्टिंगमुळे विहीर, बोअरवेलचे पाणी गेले आहे. परिसरातील नागरिकांच्या घरांना भेगा पडल्या आहेत. पशु पक्षी व माणसांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ब्लास्टिंग करुन होत असलेले उत्खनन तात्काळ थांबविण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली होती.
Post a Comment