पारनेरमध्ये विजय औटींचे भव्य शक्तीप्रदर्शन; औटी काय म्हणाले पहा...



माय नगर वेब टीम 

पारनेर – पारनेर नगर विधानसभा निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी मंगळवारी (दि.२९) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वी हिंद चौकातून रॅली काढत मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.  


पारनेर मध्ये शरद पवार गटाची उमेदवारी खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना जाहीर झालेली आहे. तर अजित पवार गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी सभापती काशिनाथ दाते व पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे इच्छुक होते. त्यांच्या सह नगर तालुक्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे हे ही इच्छुक होते. त्यामुळेच त्यांनी नुकताच अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेशही केला होता. या चौघांपैकी कोण याचा निर्णय होत नव्हता, त्यामुळे पारनेरच्या उमेदवाराची घोषणा लांबणीवर पडली होती. अखेर रविवारी (दि.२७) याचा फैसला होवून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


दाते यांच्या नावाची घोषणा होताच विजय औटी समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. रविवारी सायंकाळीच अनेक समर्थकांनी त्यांची भेट घेत अपक्ष उमेदवारी करण्याचा आग्रह धरला. सोमवारी ही मतदार संघातील त्यांच्या समर्थकांकडून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला जात होता. त्यामुळे त्यांनी सोमवारी सायंकाळी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेत सोशल मीडियाद्वारे 'चला उमेदवारी अर्ज भरायला' अशा पोस्ट व्हायरल केल्या. 



त्यामुळे मंगळवारी मतदार संघातील त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पारनेर मध्ये जमा झाले होते. समर्थकांच्या समवेत रॅलीने जावून त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करते वेळी त्यांच्या समवेत गोरेगावचे उपसरपंच अण्णा पाटील नरसाळे, चिंचोली गावचे सरपंच योगेश झंझाड, नगर तालुक्यातील कामरगावचे युवानेते सिद्धांत आंधळे, पोखरी गावचे युवानेते शेखर काशिद आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post