माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः किंवा पत्नीच्या उमेदवारी व प्रचारासाठी माजी महापौर संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीसाठी शिथिल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण व रेवती मोहिते डेरे यांनी शुक्रवारी हे आदेश दिले.
माजी महापौर संदीप कोतकर हे येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. ते स्वतः किंवा त्यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर निवडणूक लढवणार असल्याचे गुरुवारीच सचिन कोतकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी कायम असल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने शुक्रवारी त्यांची जिल्हा बंदी निवडणूक काळापूर्ती शिथिल केली आहे. २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर यादरम्यान संदीप कोतकर यांना जिल्ह्यात प्रवेश करता येणार आहे. तसेच दर सोमवारी सकाळी ८ ते १० या वेळेत कोतवाली पोलिस ठाण्यात हजेरी देण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, केडगाव हत्याकांडातही संदीप कोतकर हे आरोपी असून या गुन्ह्यातील जिल्हा बंदीची अट शिथिल करण्यासाठी त्यांनी नगरच्या न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर २२ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
Post a Comment