मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात तुफानचर्चा; काय म्हणाले पाटील पहा...



माय नगर वेब टीम 

बार्शी:  विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच घडामोडींना वेग आला आहे. महायुती, महाविकास आघाडी, इतर छोट्या मोठ्या पक्षांच्या आघाड्या, स्वबळावर लढणारे पक्ष आपल्या उमेदवार याद्या जाहीर करत आहेत, अशातच गाठीभेटींना वेग आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला धारेवर धरणारे आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता, त्यांच्या मोठ्या गाठीभेटी वाढल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक राजा माने हे बार्शीमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यास बार्शी विधानसभा लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. अंतरावली सराटी येथे राजा माने यांनी जरांगे यांची भेट घेऊन उमेदवारी संदर्भात इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान बार्शीत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. मात्र विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात जरांगे पाटील यांनी उघडपणे भूमिका घेतली होती. त्यामुळे बार्शी विधानसभा मतदार संघात जरांगे पाटील उमेदवार देणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 


तर मराठा आंदोलकांकडून बार्शी मतदारसंघातून राजा माने तर माढा मतदारसंघातून श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांचे नाव चर्चेत आहे. शनिवारी (ता - 19) छत्रपती शिवाजी महाराज प्रशालेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 30 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व कार्य अहवाल समन्वयकासमोर सादर केले होते. तर 120 जणांनी यापूर्वी अंतरवाली सराटी अर्ज दाखल केले आहेत. या इच्छुक उमेदवारांमध्ये माढा मतदारासंघातून इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे व बार्शी मतदारसंघातून ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची नावे चांगलीच चर्चेत आली आहेत. 



संधी मिळाली तर मी मागे हटणार नाही- राजा माने

विधानसभा उमेदवारी आणि निर्णयाबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजा माने म्हणाले, मराठा आरक्षण लढ्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीवर अगदी सुरवातीपासून आहे. यातून माझे नाव पुढे आले असेल. निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर मी मागे हटणार नाही. पुढील समीकरणे पाहून उमेदवारीबद्दल निर्णय घेतला जाईल, असं ते पुढे म्हणालेत.


संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी काल मध्यरात्री मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येऊन भेट घेतली आहे. काल संभाजी ब्रिगेडने शिवसेना ठाकरे गटांसोबतची युती तोडल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आल आहे. या भेटीत विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी रणनीती ठरवण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post