....अखेर निंबळक फ्लाय ओव्हर वरुन वाहतूक सुरु ! सरपंच प्रियंका लामखडे यांच्या हस्ते शुभारंभ ; नागरिकांमध्ये समाधान

 ....अखेर निंबळक फ्लाय ओव्हर वरुन वाहतूक सुरु !

 सरपंच प्रियंका लामखडे यांच्या हस्ते शुभारंभ ; नागरिकांमध्ये समाधान नगर तालुका: गेल्या एक वर्षापासून निंबळक चौकातील फ्लाय ओव्हरचे काम सुरू होते. अनेक दिवसांपासून रखडलेल्या फ्लाय ओव्हर वरून वाहतूक सुरू झाल्याने निंबळक परिसरातील गावांमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

        निंबळकच्या सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे, बाळासाहेब कोतकर, बाबासाहेब पगारे, मोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत  वाहतूकीचा शुभारंभ  करण्यात आला.

      याप्रसंगी बोलताना सरपंच प्रियंका लामखडे यांनी सांगितले की, निंबळक चौकातील फ्लाय ओव्हरचे  काम सुमारे एक वर्षापासून सुरू होते. त्यामुळे  निंबळक तसेच परिसरातील गावांमधील रहिवाशांचे रस्त्या अभावी हाल होत होते. एमआयडीसीमध्ये येणारे कामगार तसेच येथे असणारी वाहनांची मोठी वर्दळ यामुळे चौकामध्ये नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. तसेच लहान मोठे अपघात देखील घडत होते.

          सदर फ्लाय ओव्हरचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. निंबळत फ्लाय ओव्हरवरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून लवकरच दुतर्फा वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली. दरम्यान फ्लाय ओव्हर वरील वाहतूक सुरू झाल्याने निंबळक चौकाने वाहतूक कोंडी पासून मोकळा श्वास घेतला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post