खबरदार! सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकाल तर, खावी लागेल जेलची हवा



माय अहमदनगर वेब टीम 

 अहमदनगर  - लोकसभा निवडणुकीला सुरूवात झाली आहे. राजकीय पक्षाकडून प्रचार सुरू झाला असून काही उत्साही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. यापार्श्‍वभूमीवर सायबर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर ‘वॉच’ असणार आहे. कोणी तेढ निर्माण होणार्‍या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिला आहे.

लोकसभेच्या नगर दक्षिण व शिर्डी मतदार संघासाठी एकाच दिवशी, 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. राजकीय पक्षाने मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू केला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यावरही जोर दिला आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा मानस सर्वच राजकीय पक्षांचा आहे. विविध राजकीय पक्षातील काही उत्साही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाव्दारे बदनामी करणे, अफवा पसरविणे, व्देषपुर्ण पोस्ट टाकणे, खोटे संदेश पाठविण्याची शक्यता अधिक आहे. तसेच सोशल मीडियाव्दारे फेक न्युज प्रसारित करणे कायद्याने गुन्हा असुन अशा प्रकारचे संदेश व अफवा पसरवुन दोन समाजातील गटात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर ‘वॉच’ राहणार असुन अफवा पसरविणारे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा निरीक्षक आहेर यांनी दिला आहे.

सोशल मीडियाव्दारे बदनामी करणे, अफवा पसरविणे, व्देषपुर्ण पोस्ट टाकणार्‍यांविरोधात तक्रार देण्याकरिता जिल्हा पोलीस दलाकडुन 9156438088 हा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी त्या मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन निरीक्षक आहेर यांनी नागरिकांना केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post