लोकसभा निवडणुकीबाबत आमदार लंके यांनी स्पष्टचं सांगितले;... तरच मी शड्डू ठोकणार

 


माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगतानाच अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संदिग्धता मात्र कायम ठेवली आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्यास व पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास जबाबदारी स्वीकारावी लागेल, असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.


अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. त्यादृष्टीने त्यांचे मतदारसंघात कार्यक्रम व भेटीगाठी सुरू आहेत. या कार्यक्रमातून ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेतही मिळत आहेत. त्यांचे समर्थकही त्या दृष्टीने चर्चा करत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या प्रयोगाच्या निमित्ताने नगरमध्ये बोलताना आमदार लंके यांना ‘तुतारी’ वाजवण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर आमदार लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला सुरुवात जोरदार सुरुवात झाली.


महायुतीमध्ये नगर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे आहे. खासदार डॉ. सुजय विखे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तेही पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. त्यांनीही मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत ‘मतपेरणी’ केली आहे. त्यामुळे नगरची जागा भाजपकडे राहील असे चित्र आहे. असे असताना महायुतीतील अजितदादा गटाचे आमदार लंके नगरच्या जागेसाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर ते अजितदादा गटात राहतात की शरद पवार गटाकडे जातात याची उत्सुकता मतदारसंघात आहे. महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा शरद पवार गटाकडे आहे, त्यामुळे आमदार लंके शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. आमदार लंके यांच्या विविध कार्यक्रमांच्या फलकांवर शरद पवार यांचा फोटो अद्यापि कायम असतो.


आज, सोमवारी सकाळी आमदार लंके यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पुण्यात भेट घेतल्याची समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर दुपारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार लंके यांनी शरद पवार यांची भेट झाल्याचा व शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा नेता मोठा व्हावा असे वाटते, त्यादृष्टीने कार्यकर्ते चर्चा करतात. मला मित्रमंडळी जमवण्याचा छंद आहे. त्यामुळे मी वेगवेगळ्या लोकांना नेहमीच भेटत असतो. मित्रमंडळी, कार्यकर्ते आग्रह करतात. परंतु मी त्या दृष्टीने अजून विचार केलेला नाही, मात्र पक्षश्रेष्ठींनी (अजितदादा) आदेश दिल्यास जबाबदारी स्वीकारावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post