अहमदनगर लोकसभेसाठी पवारांकडून ठाकरे गटाकडे चाचपणी ! संदेश कार्लें यांना विचारणा माय अहमदनगर वेब टीम 
अहमदनगर -लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. भाजपा व काँग्रेसकडून उमेदवाराच्या याद्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपाकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. परंतु, महाविकासआघाडीकडून अद्याप नाव जाहीर करण्यात आलेले नाही. संभाव्य उमेदवार म्हणून आमदार नीलेश लंके यांच्याकडे पाहिजे जात आहे. परंतु, आमदार लंके यांनी उमेदवारी करण्यास असमर्थता दर्शविल्यास मित्रपक्षाला कोट्यात जागा देवून मित्रपक्षातील सक्षम उमेदवारास निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जावू शकते. त्या अनुषंगाने खुद्द शरद पवार यांनीच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकार्‍यांची चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्वाचे आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये सामना होणार आहे. त्या अनुषंगाने तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आमदार नीलेश लंके उमेदवार असतील असा व्होरा राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. असे असले तरी दरम्यानच्या काळात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नगरमध्ये मेळावा घेऊन शिर्डीसह अहमदनगर लोकसभेवर दावा सांगितला होता. त्यानुसार शिवसेनेकडून चाचपणीही करण्यात आली. अनेक मातब्बर नेत्यांना विचारणाही झाली. खुद्द शरद पवार यांच्यासह पवार गटाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकाही घेतल्या. शरद पवार यांनी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांना वेळ देत अहमदनगर लोकसभामतदार संघाबाबत आढावाही घेतला. तसेच लोकसभेबाबत विचारणाही केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

...तर मी तयार
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाचे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी नगरमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून शिवसैनिकांना आगामी निवडणुकांसाठी तयार रहाण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान याच मेळाव्यात नगरच्या अनेकांनी जोरदारपणे भाषणे ठोकली. परंतु, त्यांच्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांचे भाषण चर्चेत राहिले. आम्ही गद्दार नसून बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. रडायला नाही तर आम्हाला त्यांनी लढायला शिकवले आहे. आगामी काळही आपलाच आहे. असे सांगत कोणतीही जबाबदारी दिली तरी आम्ही पेलवण्यास समर्थ आहोत असे ठणकावून सांगितले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी सभागृहात एकच जल्लोष केला होता.

विधानसभा लढवणारच
गेल्या तीन टर्मपासून संदेश कार्ले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारी आहेत. आगामी होवू घातलेली विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निश्चय त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी बांधला आहे. याबाबत दरम्यानच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार व शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चाही केली असून त्यांनीही ग्रीन सिग्नल दिला असल्याचे सांगितले जात आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post